"राष्ट्रवादी'चे बालेकिल्ले भुईसपाटच्या दिशेने..! 

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 30 जुलै 2019

एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील दिग्गज नेते गणेश नाईक, सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही आता भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने "राष्ट्रवादी'ची स्थिती आभाळच फाटलंय तर ठिगळं कुठं लावणार, अशी झाली आहे. 

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसला दररोज नवे धक्‍के बसत असून, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतरही ज्येष्ठ नेत्यांचे पक्षांतर सुरू आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील दिग्गज नेते गणेश नाईक, सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही आता भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने "राष्ट्रवादी'ची स्थिती आभाळच फाटलंय तर ठिगळं कुठं लावणार, अशी झाली आहे. 

ठाणे जिल्हा 2014 पूर्वी "राष्ट्रवादी'चा गड होता. गणेश नाईक, किसन कथोरे, कपिल पाटील, वसंत डावखरे, पुंडलिक म्हात्रे असे दिग्गज नेते या जिल्ह्यात होते. मात्र, 2014 पूर्वीच कथोरे, कपिल पाटील व पुंडलिक म्हात्रे यांनी "राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी दिली; तर वसंत डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कोकण पदवीधर विधानसभेची निवडणूक जिंकली. कपिल पाटील दुसऱ्यांदा खासदार झाले; तर शरद पवार यांचे कट्टर समर्थक आमदार पांडुरंग बरोरा यांनीही नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. आता नवी मुंबईचे नेते गणेश नाईक यांनीही "राष्ट्रवादी'ची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याने या जिल्ह्यात आमदार जितेंद्र आव्हाड हे एकमेव नेते "राष्ट्रवादी'कडे उरले आहेत. गणेश नाईक नवी मुंबईतील 52 नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. 

सोलापूरमध्ये गळती 
सोलापूर हादेखील "राष्ट्रवादी'चा गड होता. मात्र, मोहिते पाटील या राज्याच्या राजकारणातल्या दिग्गज घराण्याने शरद पवार यांची साथ सोडली अन्‌ या जिल्ह्यात गळती सुरू झाली. शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार दिलीप सोपल, बबन शिंदे यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी "राष्ट्रवादी'ची साथ सोडण्याचा निर्णय पक्‍का केल्याची माहिती आहे. या नेत्यांनी "राष्ट्रवादी'ला राम राम ठोकला तर अकरा आमदार व दोन खासदार असलेल्या या जिल्ह्यात राष्ट्रवादी पूर्णत: विकलांग होणार आहे. 

साताऱ्यात बंडखोरी 
सातारा जिल्ह्यातही आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्ण्य घेतला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातही "राष्ट्रवादी'ला बंडखोरीची लागण झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकांत भोसले घराण्यातील संघर्ष शिगेला पोचण्याचे संकेत आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत शरद पवार यांनी तब्बल दीड तास चर्चा केल्यानंतर त्यांचे बंड शमेल, असे मानले जात होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाचे कारण देत त्यांनी "राष्ट्रवादी' सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. 

राणा जगजितसिंहांचीही फारकत? 
उस्मानाबादमध्येही "राष्ट्रवादी'ला जबरदस्त धक्‍का बसण्याचे संकेत आहेत. पवार कुटुंबीयांशी नातेसंबंध असलेले व राज्याच्या राजकारणातले महत्त्वाचे नेते पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आमदार राणाजगजितसिंह पाटील देखील "राष्ट्रवादी'पासून फारकत घेण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, शिवसेना की भाजप याबाबतचा अद्याप त्यांचा निर्णय झालेला नसला तरी लवकरच ते पक्षांतर करतील, असा दावा केला जात आहे. 

एकंदर ठाणे, सोलापूर, कोल्हापूर व सोलापूर हे "राष्ट्रवादी'चे बालेकिल्ले नेत्यांच्या पक्षांतरामुळे भुईसपाट होण्याच्या दिशेने असल्याचे चित्र आहे. 

राजकीय भूकंप आज 
"राष्ट्रवादी'चे आमदार वैभव पिचड व गणेश नाईक आणि "राष्ट्रवादी'च्या माजी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उद्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे; तर कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकरही भाजपवासी होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The NCP is experiencing new shocks every day