Vidhan Sabha 2019 : आयत्या बिळात चंदूबा; राष्ट्रवादीचे सोशल मीडियावर अस्सल मराठी कॅम्पेन

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादीचा प्रमुख रोष राहिला आहे, तो भाजप नेते आणि कोथरूड मतदारसंघातील युतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यावर.

विधानसभेची रणधुमाळी संपण्यास अजून फक्त दोन दिवस बाकी असल्याने आपल्या साठ्यातील आता शिल्लक राहिलेली अस्त्रे बाहेर काढण्यास सर्व राजकीय पक्षांनी सुरवात केली आहे. त्यामुळे निवडणुकीत खरी रंगत येऊ लागली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन राजकीय पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वॉर सुरू आहे. भाजपने 'रम्याचे डोस'द्वारे राष्ट्रवादीला लक्ष्य बनवल्याने राष्ट्रवादीनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून भाजप-सेना युती सरकारवर हल्लाबोल चढविला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी गेल्या पाच वर्षांत घडलेल्या काही घटनांवरून सरकारला लक्ष्य बनवले होते. आज राष्ट्रवादीने ट्विटरवर काही मराठी म्हणींवरून सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले आहेत. 'बोले तैसा चाले, ओठ दाबून बुक्क्यांचा मार, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, अडला हरी गाढवाचे पाय धरी, ये रे माझ्या मागल्या, बैल गेला झोपा केला, आयत्या बिळावर नागोबा' या मराठी म्हणींमध्ये बदल करून सेना-भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

राष्ट्रवादीचा प्रमुख रोष राहिला आहे, तो भाजप नेते आणि कोथरूड मतदारसंघातील युतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यावर. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा असा केला होता. त्यानंतर आता 'आयत्या बिळात चंदूबा' अशा आशयाची एक पोस्ट राष्ट्रवादीने आपल्या पेजवरून केली आहे. 

मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार यांचा उल्लेख पार्सल असा केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीनेही मूळचे कोल्हापूरचे असलेल्या चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिल्याने त्यांनाच टार्गेट बनवलं आहे. विरोधकांनी कोथरूडमधील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे हे आमदार म्हणून निवडून आले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शिंदे यांना 23 हजारांपेक्षा जास्त मते पडली होती. त्यामुळे यावेळेस काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवार न देता किशोर शिंदेंना पाठिंबा दिला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP has targeted BJP and Shiv Sena on social media