
झिरवाळांबाबतच्या 'त्या' विधानावर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण; म्हणाले...
मुंबई : आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असून भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा विजय झाला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासातील सर्वांत तरूण विधानसभा अध्यक्ष ते झाले आहेत. याआधी विधानसभेला अध्यक्ष नसल्याने ते कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे पाहत होते. नार्वेकर यांची निवड झाल्यामुळे झिरवाळ यांना खुर्ची खाली करावी लागली आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांच्याकडून अनावधानाने त्यांच्याविषयी चुकीचा शब्द बोलला गेला होता. त्यावर जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
(Jayant Patil And Narhari Zirwal)
"आदिवासी असूनही नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेचं उपाध्यक्षपद सांभाळलं." असं वादग्रस्त वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनीही यावर आक्षेप घेतला. त्यानंतर जयंत पाटील यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हे विधान अनावधानाने झालं असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर त्यांनी ट्वीट करत या प्रकरणाचा खुलासा केला आहे.
"विधानसभेचे उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवाळ हे आमच्या पक्षाचे आदिवासी समाजाचे अत्यंत महत्वाचे नेते आहेत, आदिवासी समाजातून येऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत ते राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत, याचा मला कायम अभिमान आहे. मी सभागृहात बोलताना जे बोललो त्याचा आशय हाच होता." असा खुलासा त्यांनी ट्वीट करत केला आहे.
हेही वाचा: हकालपट्टीच्या खोट्या बातमीनंतर ठाकरेंचा आढळरावांना फोन; म्हणाले...
या प्रकरणानंतर भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना जयंत पाटलांवर जोरदार टीका केली असून "जयंत पाटलांचा माज अजून गेला नाही, त्यांचा माज आम्ही उतरवणार आहोत. त्यांच्यातील जातीवाद कमी होताना दिसत नसून त्यांचा माज आम्हाला उतरावा लागेल." असं पडळकर म्हणाले आहेत.
Web Title: Ncp Jayant Patil Former Assembly Speaker Narhari Zirwal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..