Vidhan Sabha 2019 : अजित पवार म्हणतात, 'निवडणूक महाराष्ट्राची अन् नेते गुजरातचे'

भाऊसाहेब गाडे
Tuesday, 15 October 2019

- गुजरातच्या नेत्यांना स्थानिक समस्या समजणार का?

- आम्ही डान्सबार बंद केले

- या सरकारने ते पुन्हा सुरु केले. 

कडा : महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्याधाऱ्यांकडून गुजरात नेत्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येत आहे. त्या नेत्यांना स्थानिक समस्या काय समजणार आहेत. आमच्या काळात आम्ही डान्सबार बंद केले, पण यांच्याकाळात परत छमछम सुरु झाली. उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचार सभेत मंगळवारी (ता. १५) पवार बोलत होते. उमेदवार बाळासाहेब आजबे, भाजपचे माजी आमदार साहेबराव दरेकर, महेबुब शेख, सतीश शिंदे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, आम्ही 12 महिन्यांत कारखाना उभारतो. मात्र, भाजप आमदार भीमराव धोंडे ३२ वर्षांपासून सुतगिरणी उभारत आहेत. गेल्या पाच वर्षांत निष्क्रीय असलेल्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दहा रुपयांत जेवण देण्याची घोषणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्यांवर चौकशा लावल्या जात आहेत. सरकार बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारु शकत नाही, तर महापुरुषांचे स्मारक कसे उभारणार असा सवाल करत मतदारांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले याचा जाब सरकारला विचारावा असे आवाहनही त्यांनी केले.

साहेबराव दरेकर यांची आजबेंना साथ

भाजपचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनीही अजित पवार यांच्या सभेला हजेरी लावली. भाषणात राष्ट्रवादीचे आजबे यांना साथ देणार असल्याचे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Ajit Pawar Criticizes on BJP Maharashtra Vidhan Sabha 2019