'अजित पवार यांनी राणेंकडे केली पैशांची मागणी'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

अजित पवार यांच्या नंबरवरून राणे यांना फोन आला, त्यावेळी फोनवरून मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. शिवाय, रक्कम एका खात्यावर लवकरात लवकर भरा, असेही सांगितले.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल हॅक झाला होता. मोबाईल हॅक झाल्यानंतर हॅकरने मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेंद्र राणे यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, राणे यांना संशय आल्याने त्यांनी पवार यांच्या स्वीय सहाय्यकाला फोन केला. रविवारी (ता. 29) हा प्रकार घडला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

नरेंद्र राणे यांना रविवारी सकाळी अजित पवार यांच्या नंबरवरून फोन आला, त्या फोनवरून एक व्यक्ती बोलत होती. कुणाल नावाच्या व्यक्तीने फोनवरून नरेंद्र राणे यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी केली. शिवाय, रक्कम एका खात्यावर लवकरात लवकर भरा, असा निरोपही त्या अज्ञात व्यक्तीने दिला. पण, राणे यांना याबाबत संशय आला. त्यांनी अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाला फोन लावला. त्यावेळी अजित पवार हे पुण्यात होते. राणे यांनी अर्ध्या तासाने अजित पवार यांना फोन लावला, तेव्हा फोनवरून लवकरच पैसे खात्यात जमा करतो, असे त्यांनी सांगितले. मात्र, अजित पवार यांना ते काय म्हणत आहेत, हे समजेनासे झाले.

अजित पवार राणेंना म्हणाले, मी तुम्हाला फोन केलेला नाही, माझा फोन माझ्याकडेच आहे. कोणत्या पैशांसदर्भात तुम्ही बोलत आहात, असा प्रश्नच अजित पवारांनी उपस्थित केला. त्यानंतर अजित पवार यांचा फोन हॅक झाल्याचं समजले. नरेंद्र राणे यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइममध्ये याबाबत तक्रार दिली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader ajit pawar demands money to narendra rane on mobile hack