अजित पवार भेटले भाजप नेत्याला; म्हणतात, 'राजकीय चर्चा नाही'

टीम ई-सकाळ
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते प्रतापराव चिखलीकर यांची भेट घेतली.

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आज, पुन्हा भाजप नेत्याला भेटले आहेत. त्यामुळं राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट राजकीय नव्हती. त्याचा राजकीय अर्थ घेऊ नका, असं अजित पवार यांनीच मीडियाशी बोलताना स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आज, विधानसभेत विश्वास दर्शक ठरावाला सामोरं जात असताना ही अजित पवारांची भाजप नेत्यांशी झालेली चर्चा महाविकास आघआडीच्या नेत्यांची धडधड वाढवणारी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते प्रतापराव चिखलीकर यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. आज विधानसभेत विश्वास दर्शक ठरावावेळी अजित पवार सभागृहात काही दगा फटका करतील का? अशी चर्चा सुरू झाली. याचा अंदाज आल्यामुळेच अजित पवार यांनी बैठकीनंतर तातडीने मीडियाशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, 'प्रतापराव चिखलीकर यांची भेट राजकीय नव्हती. राजकारणात आम्ही एकमेकांचे विरोधक असलो तरी आमची ओळख असते संबंध असतात. चिखलीकर आणि माझ्यात झालेल्या बैठकीचा राजकीय अर्थ अजिबात काढू नये. सभागृहात आज विश्वास दर्शक ठराव मांडला जात आहे. मी स्पष्टपणे सांगतो की, मी कोणाच्याही संपर्कात नाही. सभागृहातील लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून लोकांना अजित पवार कोणाच्या बाजूने उभा राहिला हे कळेल. सभागृहात कोर्टाचा आदेशानुसार ठराव, मतदान होईल. संजय राऊत यांनी सांगितलेला 170 चा आकडा गाठला जाईल. उपमुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारसाहेब, सोनिया गांधी,उद्धव ठाकरे जी हे निर्णय घेतील. मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मी घेईन.'

आणखी वाचा - उद्वव ठाकरे आज, बहुमत करणार सिद्ध

आणखी वाचा - बहुमत चाचणी संदर्भात संजय राऊत यांनी केलंय ट्विट

आज, विश्वास दर्शक ठराव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज, विधानसभेत त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सध्या विधानसभेत 170च्या आसपास आमदार आमच्या पाठिशी आहेत, असा दावा महाविकास आघाडी कडून केला जात आहे. हे 170 आमदारांचं बहुमत सिद्ध करण्याचं शिवधनुष्य आज, उद्धव ठाकरे यांना उचलावं लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader ajit pawar meets bjp leader pratap chikhalikar