esakal | आमच्याकडे नवे चेहरे आहेत, लवकरच जाहीर करू : अजित पवार

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

राज ठाकरे स्वतः एक नेते आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होते. प्रत्येकाचे दिवस येतात. भाजपचे एकेकाळी फक्त दोन खासदार होते. प्रत्येकाच्या राजकीय आयुष्यात चढ-उतार येतात, असे पवार यांनी सांगितले. 

आमच्याकडे नवे चेहरे आहेत, लवकरच जाहीर करू : अजित पवार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : सर्वांना बरोबर घेऊन जाणारी ही शिवस्वराज्य यात्रा आहे. सरकारच्या अपयशाबरोबरच आम्ही काय करणार आहोत हे यात्रेतून सांगणार आहोत. आमच्याकडे नवे चेहरे येत असून, लवकरच नावे जाहीर करू. उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर तुम्हाला कळेल. आम्ही जनसंपर्क ठेवला असून, आम्हाला याची काळजी नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा आज (गुरुवार) तिसरा दिवस आहे. यानिमित्त अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले. सांगली, कोल्हापूरमधील परिस्थिती गंभीर आहे. सरकारच्या भोंगळ कारभारामुळे ही पूरस्थिती उद्धभवली आहे. कर्नाटक, महाराष्ट्रात भाजपचे सरकार असूनही त्यांना नियोजन करता आले नाही. आलमट्टी धरणातून पाणी सोडण्याची विनंती सरकारने कर्नाटककडे करायला हवी होती. हवामान खात्याकडून इशारा देऊनही सरकारने काहीच उपाययोजना केल्या नाहीत.

अजित पवार म्हणाले, की निवडणुकीच्या काळात पक्षांतर होतच असतात. निष्ठेला किती महत्त्व द्यायचे हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या पक्षातील प्रत्येक जण कोणत्या कारणामुळे गेला हे सगळ्यांनाच माहिती आहे. सहकारी संस्था अडचणीत आल्याने काही जण गेले, तर काही जण चौकशीला घाबरून गेले आहेत. सत्ताधारी पक्षाचा आसरा घेतला तर यंत्रणा जास्त त्रास देणार नाहीत, असे यांना वाटते. शेवटी जनताच सर्वकाही ठरविते. भाजप-शिवसेनेने नागरिकांचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे नागरिकांनी त्यांना बाजूला करावे. आम्ही आमची भूमिका लोकांसमोर मांडत आहोत. कलम 370 झालेला निर्णय चांगला होता. त्याचा जास्तीत जास्त परिणाम काश्मीरमध्ये  होणार आहे. इतर राज्यांमध्ये याचा परिणाम होणार नाही. ही निवडणूक महाराष्ट्राची आहे, त्यामुळे येथील प्रश्नांना याचा काही फरक पडणार नाही.

राज ठाकरे स्वतः एक नेते आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होते. प्रत्येकाचे दिवस येतात. भाजपचे एकेकाळी फक्त दोन खासदार होते. प्रत्येकाच्या राजकीय आयुष्यात चढ-उतार येतात, असे पवार यांनी सांगितले.