Vidhan Sabha 2019 : फोडाफोडीचा शेवट आम्ही करू - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

‘पक्षातील नेत्यांच्या फोडाफोडीची सुरवात त्यांनी केली. आता शेवट आम्ही करू,’ असा इशारा देत राजकारणात काट्यानेच काटा काढायचा असतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज शिवसेना-भाजपला लगावला.

विधानसभा 2019 
मुंबई - ‘पक्षातील नेत्यांच्या फोडाफोडीची सुरवात त्यांनी केली. आता शेवट आम्ही करू,’ असा इशारा देत राजकारणात काट्यानेच काटा काढायचा असतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज शिवसेना-भाजपला लगावला. आज भाजपचे माजी आमदार दौलत दरोडा आणि काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.

भाजप-शिवसेनेतील अनेक दिग्गज उमेदवार ‘राष्ट्रवादी’च्या संपर्कात असून, जे येतील त्यांचे स्वागत असल्याचे पवार म्हणाले. 

‘राष्ट्रवादी’चे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शहापूर मतदारसंघातील माजी आमदार दौलत दरोडा यांनी आज ‘राष्ट्रवादी’मध्ये प्रवेश केला, तर पंढरपूरची जागा ‘राष्ट्रवादी’कडे असल्याने भारत भालके यांनी ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला. 

राजकारणात काट्यानेच काटा काढायचा असतो, असे सांगून अजित पवार म्हणाले की, इतर पक्षांतील आमदारांना सत्ताधारी भाजप-शिवसेनेने राजकीय आमिष दाखवून त्यांच्याकडे घेतले. त्यामुळे त्या त्या मतदारसंघातील भाजप-शिवसेनेचे अनेक निष्ठावंत व इच्छुक कार्यकर्ते नाराज झाले असून, ते आमच्या संपर्कात आहेत. त्यांना योग्य वेळी पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली जाईल.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले असून, महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आघाडीची अधिकृत घोषणा व उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.

‘बारामतीत काळजी नाही’
बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता, ‘बारामतीच्या जनतेने आम्हाला कायम लाखाच्या मताधिक्‍याने विजयी केले आहे. त्यामुळे, विरोधी पक्षाचा उमेदवार कोणताही असला, तरी त्याची काळजी नाही,’ असे उत्तर त्यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar today criticized Shiv Sena-BJP