Chhagan Bhujbal : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर भुजबळांचं स्पष्टीकरण; म्हणाले, देशाविरुध्द बोललो तर ती.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal News

दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं.

Chhagan Bhujbal : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर भुजबळांचं स्पष्टीकरण; म्हणाले, देशाविरुध्द बोललो तर ती..

Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP leader) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळं सध्या ते चर्चेत आहेत. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजेत, त्याऐवजी शाळेत सरस्वती (Saraswati) आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला होता.

या विधानानंतर आज भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, त्या दिवशी सत्यशोधक समाजाचा आदर करण्याचा कार्यक्रम होता. माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे. देशाच्या विरुध्द बोललो तर ती वेगळी गोष्ट आहे. पण, मी इतकंचं म्हटलं की फुले, शाहू, आंबेडकरांनी आपल्याला प्रत्यक्ष शिकवलं आहे आणि त्यांचा आम्ही आदर करायला हवा. आपण त्यांची का पूजा करत नाही. त्यांची पूजा करायला हवी, असं माझं म्हणणं होतं.

हेही वाचा: PFI च्या ट्विटर अकाउंटवरही बंदी; सरकारच्या तक्रारीनंतर 'ट्विटर इंडिया'ची मोठी कारवाई

सरस्वतीनं आपल्याला काही शिवकवलं नाही, त्यामुळं पूजनाचा प्रश्न येतोच कुठं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. फुले, शाहू, आंबेडकर, आण्णासाहेब कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोठं काम केलं आहे. त्यांचा सन्मान होणं आवश्यक आहे. आम्ही सुध्दा हिंदु आहोत. हिंदुंसाठी आम्ही देखील बरीच कामं केली आहेत. देवीच्या दर्शनाला देखील जातो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Navratri : नवरात्रोत्सवात मुस्लिम दुकानांतून कोणत्या वस्तू घेऊ नका; साध्वी प्रज्ञांचं आवाहन

काय म्हणाले होते छगन भुजबळ

सोमवारी छगन भुजबळ यांनी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित महोत्सवात उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजे, त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात? असा सवाल भुजबळांनी केला होता. देशात अंधश्रद्धा वाढीला लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी छगन भुजबळांनी केला. अंधश्रद्धा आणि आमच्या महिला-भगिनींबाबत काही विचारायला नको किंवा काही सांगायला नको. शाळांमध्ये सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. पण सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांचा फोटो लावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो लावा. कारण सरस्वतीचा, शारदा यांना आम्ही काही पाहिलं नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवलं नाही. त्यांनी तीन टक्के लोकांना शिकवले. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची, असं भुजबळ म्हणाले होते.