छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश निश्चित?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या छगन भुजबळ यांचे 1990-91च्या दरम्यान मंडल आयोगाच्या विषयावरून शिवसेनेत मतभेद झाले.

मुंबई : आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित असल्याचे मानले जात आहे. उद्या (१ सप्टेंबर) भुजबळ मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भुजबळांचा शिवसेना प्रवेश होईल, अशी बातमी काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारीत केली आहे. 

नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेत भुजबळ सहभागी झाले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू होती. पण, त्याला अधिकृत दुजोरा मिळत नव्हता. त्यात खुद्द भुजबळांनी ही अफवा असल्याचे सांगितले होते. तर, भुजबळ यांच्या सभाव्य पक्षप्रवेशावर शिवसेनेतूनही नाराजी होती.

त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील शिवसेना कार्यकर्त्यांना भुजबळ यांचा पक्षप्रवेश होणार नसल्याचे सांगितल्याची चर्चा होती. पण, या सगळ्या शक्यता आणि अशक्यतांना पूर्ण विराम मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन दिवसांतील घडामोडींनंतर भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहेत. पक्षप्रवेशापेक्षा ते स्वगृही परतत आहेत, असा सूर शिवसेनेतून उमटू लागला आहे. 

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का 
गेल्या दोन महिन्यांत विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठी गळती लागली. एकापाठोपाठ एक नेते भाजप, शिवसेनेत प्रवेश करू लागले. त्यात राष्ट्रवादीला सचिन अहीर, पद्मसिंह पाटील यांच्यानंतर छगन भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश सर्वांत मोठा धक्का असेल, असे मानले जात आहे. 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि पुन्हा शिवसेना
एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या छगन भुजबळ यांचे 1990-91च्या दरम्यान मंडल आयोगाच्या विषयावरून शिवसेनेत मतभेद झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसची कास धरली. काँग्रेसमध्ये ते शरद पवार यांच्या जवळ गेले. त्यांचे विश्वासू शिलेदार म्हणून भुजबळ यांची ओळख निर्माण झाली होती.

पुढे पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. पवार यांच्यानंतर पक्षातील खालच्या फळीतील नेत्यांमध्ये भुजबळांचा समावेश होता. भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, आर. आर. पाटील, या मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात वाढवली. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मुळे घट्ट करण्यात भुजबळांचा मोठा वाटा होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader chhagan bhujbal may join Shiv Sena