
'ही चलाखी राज्यात चालणार नाही'; पवारांनी फडणवीसांना सुनावलं
देशात कुठेही तुमची चलाखी चालेल पण महाराष्ट्रात चालणार नाही, अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहीत पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन केंद्र आणि राज्यातील टॅक्सवरुन आरोप प्रत्यारोप आणि दावे होत आहेत. यातच फडणवीस यांनी केलेला दावा खोडून काढत रोहित पवार यांनी पोलखोल केली आहे. रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पेट्रोलवरील करासंदर्भात फडणवीस यांचा दावा खोडून काढत, 'खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे' असा घाणाघात केला आहे.
मागील काही दिवसांपासून देशात आणि राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. पाच राज्यातील निवडणुकीनंतर 35 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. यावरुन विरोधकांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे नेतेही आपला बचाव करताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन राज्य आणि केंद्रामध्ये आरोप, प्रत्याआरोपाच्या फैरी आणि दावे झडले आहेत. असाच एका दावा करताना राज्यातील इंधन दरवाढीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवसी यांनी केलं होतं. फडणवीस यांचा दावा खोडून काढत रोहित पवार यांनी त्यांना चांगलेच सुनावलं आहे.
फडणवीस काय म्हणाले होते?
पुण्यातील कार्यक्रमाl महागाईच्या मुद्यावरुन बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला टार्गेट केलं. पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात, असे विधान यावेळी त्यांनी केलं होतं.
रोहित पवार काय म्हणाले?
फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. फडणवीस यांनी केलेलं विधान खोटे असून भाजप नेत्यांना खोटं बोलायची सवयच असल्याची टीका त्यांनी केली. केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रुपयापैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरीही केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी राज्याला १२ रुपये मिळत असल्याचे फडणवसी सांगत आहेत. विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रुपये दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही.