

मुंबई- माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड तणाव येतोय. त्यातच राजकीय नेत्यांना पोलीस संरक्षण दिलं जात आहे. त्यामुळे माझे पोलीस संरक्षण काढून ते जनतेच्या सेवेत द्यावे अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट करून विनंती केली आहे. त्या पोस्टमध्ये म्हणाल्यात की, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय,हे स्पष्टपणे दिसत आहे.