esakal | नव्या आघाडीसाठी जोरबैठका
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई - काँग्रेस नेत्यांशी चर्चा आटोपून बुधवारी पंचतारांकित हॉटेलातून बाहेर पडताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. (शेजारील छायाचित्रात)काँग्रेसनेते माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण.

राज्यात सत्तामार्ग मोकळा व्हावा म्हणून नव्या आघाडीसाठी जोरबैठका सुरू झाल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आज बोलणी पार पडली. राज्यामध्ये लवकर सत्ता स्थापन करण्यावर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे एकमत झाले असून, किमान समान कार्यक्रमाचा आराखडा तयार केला जात आहे.

नव्या आघाडीसाठी जोरबैठका

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यात सत्तामार्ग मोकळा व्हावा म्हणून नव्या आघाडीसाठी जोरबैठका सुरू झाल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आज बोलणी पार पडली. राज्यामध्ये लवकर सत्ता स्थापन करण्यावर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे एकमत झाले असून, किमान समान कार्यक्रमाचा आराखडा तयार केला जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व माणिकराव ठाकरे यांच्यात आज वांद्रे येथील हॉटेल ट्रायडन्टमध्ये पहिली बैठक पार पडली. काँग्रेसने शिवसेनेसोबत घेतलेली ही पहिलीच अधिकृत बैठक असल्याने सत्तास्थापनेची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे मानले जाते. 

आजच्या या बैठकीत सत्तास्थापनेबाबतची प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. नवे सरकार स्थापन करण्यासाठीची चर्चा योग्य मार्गाने सुरू असून, योग्य वेळी त्याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले; तर शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेसची तयारी असल्याने आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत सदिच्छा बैठक झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

राष्ट्रवादीकडून समिती
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या वेळी सत्तास्थापनेची चर्चा व वाटाघाटी करण्यासाठी राष्ट्रवादीने पाच नेत्यांची समिती नेमली असून, यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या समन्वय समितीमध्ये सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे यांचा समावेश आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही आज पहिली बैठक सायंकाळी पार पडली. यामध्ये समान किमान कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्याबाबत चर्चा झाली. 

शिवसेनेतही चर्चा
सुरुवातीला काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा सत्तास्थापन करण्याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यानंतर शिवसेनेसोबत त्यावर चर्चा करण्यात येईल. नव्या सरकारचा अजेंडा ठरवण्यासाठी काही प्रमुख मुद्‌द्‌यांवर आघाडीच्या बैठकीत संयुक्‍त निर्णय होणार आहे, तर शिवसेनेतही सत्तेतील पदवाटपाबाबत चर्चा सुरू झाल्या असून, आगामी दोन- तीन दिवसांत समान किमान कार्यक्रमाचीही रूपरेषा तयार होईल, असे सांगण्यात येते. नव्या आघाडीला सत्तेत जाताना राज्यातील जनतेसमोर ठोस कार्यक्रम ठेवावा लागणार आहे. याशिवाय मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर पदांच्या बाबतीत सर्वसहमतीचा तोडगा काढावा लागणार आहे. त्यामुळे या सर्व चर्चांसाठी वेळ लागणार असल्याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे.

राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत म्हणून भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. 
- पृथ्वीराज चव्हाण, नेते, काँग्रेस

किमान समान कार्यक्रमावर आधी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर शिवसेनेसोबत बोलणी होईल.
- बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

आघाडी केली म्हणजे धर्मांतर केलेले नाही. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल.
- संजय राऊत, नेते, शिवसेना

राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, त्यामुळे नेत्यांनी चिंता करू नये.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी