राज्यातील नऊ हजार जनावरे लंपी स्कीन आजारातून बरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lumpy skin animal disease

राज्यातील आठ हजार ९११ जनावरे ही उपचारानंतर लंपी स्कीन या आजारातून पूर्णपणे बरी झाली आहेत.

राज्यातील नऊ हजार जनावरे लंपी स्कीन आजारातून बरे

पुणे - राज्यातील आठ हजार ९११ जनावरे ही उपचारानंतर लंपी स्कीन या आजारातून पूर्णपणे बरी झाली आहेत. आजअखेरपर्यंत राज्यभरातील ३० जिल्ह्यांमधील २४ हजार ४६६ जनावरे ही लंपी स्कीन आजाराने बाधित झाली आहेत. या आजाराला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने लंपी स्कीन प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. यानुसार आतापर्यंत ५८ लाख १४ हजार जनावरांचे मोफत लसीकरण पूर्ण कऱण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील एकूण मोफत लसीकरणामध्ये लंपी स्कीनने ग्रासलेल्या गावांच्या आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिसरातील ४० लाख ३४ हजार तर, या क्षेत्राबाहेरील १७ लाख ८० हजार जनावरांचा समावेश असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. हा आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेत उपचाराने बरा होणारा आजार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांची काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये, असे आवाहन सिंह यांनी केले आहे.

राज्यात सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत (ता. १९ सप्टेंबरअखेरपर्यंत) देशातील ८५ हजार ६२८ जनावरांचा लंपी स्कीन या आजाराने मृत्यू झाला आहे. या मृत्यूमध्ये राजस्थानमधील सर्वाधिक ५५ हजार ४४८ जनावरांचा समावेश आहे. राजस्थानच्यापाठोपाठ पंजाबमधील १७ हजार ६५५, गुजरातमधील ५ हजार ८५७, हिमाचल प्रदेश येथील ४ हजार ३४७ आणि हरियानातील २ हजार ३२१ जनावरांच्या मृत्यूंचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमधील १ हजार ७९६ गावांमध्ये लंपी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी आतापर्यंत सर्व जिल्ह्यांना मिळून लसीच्या एकूण ८१ लाख ६२ हजार मात्रा (डोस) उपलब्ध करून दिल्या आहेत.

महाराष्ट्रात ७९६ जनावरांचा मृत्यू

दरम्यान, लंपी स्कीन या आजाराने आतापर्यंत महाराष्ट्रातील ७९६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक जळगाव जिल्ह्यातील १६५ जनावरांच्या मृत्यूचा समावेश आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यातील जनावरांच्या मृत्यूची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे - नगर - ७१, धुळे - १७, अकोला-१२४, पुणे - ६६, लातूर -९, औरंगाबाद - १८, सातारा - ५३, बुलडाणा-८४, अमरावती-८०, उस्मानाबाद -०२, कोल्हापूर - ४४, सांगली -१२, यवतमाळ -०१, सोलापूर -०७ वाशीम-८, नाशिक - ०२, जालना - ०८, पालघर -०२, ठाणे -०९, नांदेड -०५, नागपूर - ०३, रायगड, नंदूरबार आणि वर्धा प्रत्येकी -०२.

राज्यातील जनावरांचे लंपी स्कीन आजारामुळे झालेले मृत्यू हे निष्काळजीपणामुळे झालेले आहेत. जनावर आजारी पडल्यानंतर त्याच्यावर प्रत्यक्ष उपचार करण्यासाठी चार ते पाच दिवसांहून अधिक काळ लोटल्यामुळे हे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावर आजारी पडताच, तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा.

- सचिंद्र प्रताप सिंह, पशुसंवर्धन आयुक्त.