
तात्या लांडगे
सोलापूर : पाटखळ (ता. मंगळवेढा) येथील निशांत सावतचे (वय २०) घराशेजारील चुलत वहिनी किरणसोबत (वय २३) प्रेमसंबंध जुळले. बारावीपर्यंत शिकलेला निशांत कराड येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये कामाला होता. २० दिवसांपूवी तो किरणला कायमचेच घेऊन जायचे म्हणून गावी आला होता. त्या दोघांनी ‘सापही मेला पाहिजे आणि काठीही तुटली नाही पाहिजे’ असा तगडा प्लॅन केला. निशांतने पंढरपूर हद्दीतून एक अनोळखी मनोरुग्ण महिलेला हेरून गावी आणले होते.
किरणच्या आई-वडिलांनी तिचा विवाह धुमधडाक्यात लावला होता. किरणला छोटी मुलगी आहे. पती तिच्यावर जिवापाड प्रेम करायचा, पण निशांतने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. काही महिन्यांनंतर त्यांनी पळून जाऊन एकत्र राहण्याचा डाव आखला. त्यासाठी निशांतने मनोरुग्ण महिलेला आणून गळा आवळला आणि तिचा मृतदेह घराजवळील कडब्याच्या गंजीत टाकला. तत्पूर्वी, त्याने किरणला खानापूरला (जि. सांगली) सोडले. तेथून ओळखीच्या मित्राला सांगून कराडला न्यायला सांगितले.
खानापूरहून काही तासात परतलेल्या निशांतने गंज पेटवून दिली आणि आरडाओरड सुरू केली. किरणने आत्महत्या केल्याचीही अफवा पसरवली. पण, पोलिस या घटनेकडे गांभीर्याने पाहात होते. घटनेबद्दल त्यांचा संशय वाढत होता. जळालेला मृतदेह, तिच्या अंगावरील मोबाईल पाहून पोलिसांना ती आत्महत्या नसल्याची खात्री झाली. पोलिसांनी किरणच्या मोबाईलचा सायबर टीमकडून ‘सीडीआर’ काढला. त्यानंतर निशांतच्या मोबाईलमधील किरणचे फोटो पाहून खात्री झाली आणि सत्य समोर आले.
किरणच्या सासरच्यांना अडकवण्याचा निशांतचा डाव
आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने तिचे माहेरील लोक किरणच्या पतीला जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे करतील, असा विश्वास निशांत व किरण यांना होता. सुरवातीला सर्व काही तसेच होत होते. किरणच्या आत्महत्या प्रकरणात तिचे सासरचे तुरुंगात जातील आणि आपण कायमस्वरूपी एकत्र राहू शकतो, असा त्यांचा प्लॅन होता, अशी बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. घटनेच्या दिवशी दीड-दोन तासांनी किरण सतत निशांतच्या मोबाईलवर कॉल करत होती. त्यावेळी ‘ही कोण’ असा प्रश्न पोलिसांनी केला आणि निशांतने मैत्रीण असल्याचे सांगितले होते.
आई-वडिलांची लाडकी किरण; बदनामी नको म्हणून आखला डाव
माहेरील कौटुंबिक स्थिती उत्तम असलेली किरण आई- वडिलांची लाडकी होती. आपण पळून गेल्यावर त्यांची समाजात बदनामी होईल म्हणून तिने निशांतसोबत एक प्लॅन आखला. निशांतने मनोरुग्ण महिलेला जाळले आणि किरण असल्याचे भासवले. घटनेच्या दिवशी किरण व तिच्या पतीमध्ये किरकोळ भांडणही झाले होते. तिला मारून सासरच्यांनी जाळले आणि आत्महत्या केल्याचे भासवले असावे, असा संशय किरणच्या माहेरच्यांना होता. त्यांनी किरणच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती. पण, पोलिसांनी किरणच्या घरात पाहिले, पण भांडण झाल्यासारखे काहीही दिसत नव्हते. त्यांनी किरणच्या माहेरच्यांना समजावून सांगून काही तास शांत थांबविले होते, अन्यथा किरणचा पती व त्याचे कुटुंब हकनाक या गुन्ह्यात अडकले असते, असे पोलिस अधिकारी सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.