
'भोंगा हा महत्वाचा मुद्दा नाही तर रझा अकादमीसारख्या संघटना खरी समस्या'
भोंगा ही खरी समस्या नाही, RSS ला टॅग करत नितेश राणेंनी केली मोठी मागणी
सध्या भोंग्यावरून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या संदर्भात आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहे. भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने राज ठाकरे आणि कार्यकर्ते पेटून उठले आहेत. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट करत थेट रझा अकादमीसारख्या दहशतवादी संघटनांवर आरोप केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भोंगा हा महत्वाचा मुद्दा नाही तर रझा अकादमीसारख्या संघटना खरी समस्या असल्याचं विधान आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. रझा अकादमी आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याची मागणीही केली असून या संघटना समाजामध्ये विष कालवण्याचं काम करतात असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा: कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होताच राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट
यांसदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, लाऊडस्पीकर हा खरा प्रॉब्लेम नसून रझा अकादमी, पीएफआय सारख्या दहशतवादी संघटना ज्या विष परसरवतायत त्या खरी समस्या आहेत. याविरोधात एकत्र येऊन लढण्याची सध्या गरज आहे, प्रत्येकाने सोबत येऊन त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजे, त्यानंतरच शांतता नांदेल. खरे मुस्लिम कधीच देश किंवा राज्याच्या विरोधात जाणार नाहीत. ते देशावर, इथल्या मातीवर हिंदूंच्या इतकंच प्रेम करतील. रझा अकादमी, पीएफआय सारख्या संघटना द्वेष आणि राग समाजात पसरवत आहेत. अमरावती आणि नांदेडमध्ये घडलेल्या दंगली याचं उदाहरण आहेत. त्यामुळे आता त्यांना संपवण्याची वेळ आली आहे. रझा अकादमी दहशतवादी संघटना असून त्याची चॅरिटी कमिशनकडे नोंदणी नाही. त्यांना कोणाकडून पैसे मिळतात? हे सर्व लवकरात लवकर थांबायलाच हवं, असंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा: जोधपूर हिंसाचार: भाजप अध्यक्ष सतीश पुनियांचं राज्यपालांना पत्र
दरम्यान, त्यांनी ट्विटद्वारे केलेल्या मागणीनंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. इकडे मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा कालावधी काल संपला आहे. त्याआधीच पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली. राज्यभरात मशिदींबाहेर पोलिस फौजफाटा तैनात आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज ठाकरे यांच्या घराबाहेरील पोलिस सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
Web Title: Nitesh Rane Demand To Raza Academy And Pfi Organization Finished Tag To Rss
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..