Nitin Gadkari News : गडकरींना तरुणीने दिली धमकी? पोलिसांनी केली मोठी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari News

Nitin Gadkari News : गडकरींना तरुणीने दिली धमकी? पोलिसांनी केली मोठी कारवाई

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्याने खळबळ माजली होती. गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचे फोन आले आहेत, त्यामुळं खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील महिन्याभरापूर्वी त्यांना धमकीचे फोन आले होते. यानंतर या धमकी प्रकरणात मंगळुरुमधून एका तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच नागपूर पोलिसांची एक टीम तातडीनं बेळगावला रवाना झाली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, नागपूर पोलिसांनी मंगळूरू येथील रजिया नावाच्या तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा फोन आणि रजियाला करण्यात आलेला फोन हे दोन्ही फोन कॉल बेळगावच्या तुरुंगामधूनच झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. तसेच सध्या रजिया नावाची तरुणी मंगळुरुच्या रुग्णालयात दाखल आहे आणि स्थानिक पोलीस तिची चौकशी करत आहेत.

गेल्यावेळी १४ जानेवारीला ज्याच्या नावे बेळगावच्या तुरुंगातून धमकीचे फोन केले होते. त्याच जयेश कांथा ऊर्फ जयेश पुजारी नामक व्यक्तीच्या नावे आज पुन्हा धमकीचे फोन आले होते. दरम्यान या प्रकरणात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नागपूर पोलिसांनी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागणे व धमकी देणे असा गुन्हा दाखल केला आहे. तसेच नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला रवाना झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडकरी यांच्या कार्यालयात मंगळवारी लागोपाठ तीन कॉल होते. फोनवरून धमकी देणाऱ्याने जयेश पुजारी बोलत असल्याचे सांगत दहा कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच याची वाच्यता पोलिसांकडे करू नये असा इशाराही दिला होता. आता या प्रकरणी पहिली अटक झाल्याने प्रकरणावर आणखी प्रकाश पडणार आहे.