खासदार पक्षासोबतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajendra Patil Yadravkar

सध्या शिंदे गटात सहभागी झालेले शिरोळ मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते, त्यातही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध.

खासदार पक्षासोबतच

कोल्हापूर : जिल्ह्यातील शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्रिपद मिळालेले व सध्या शिंदे गटात सहभागी झालेले शिरोळ मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते, त्यातही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध. ते २०१४ लाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात होते, पण ते पराभूत झाले. दोन्ही काँग्रेसची २०१९ ला आघाडी झाली, त्यात शिरोळची जागा आघाडीत दुसऱ्या पक्षाला गेल्याने व अन्य पर्याय नसल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व ते विजयी झाले. निकालानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देत मंत्रिपदही मिळवले.

राधानगरी मतदार संघाचे दुसरे बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर हे सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, २०१४ व २०१९ मध्ये पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावरच ते विधानसभेत पोहोचले.

तिसरे बंडखोर नेते राजेश क्षीरसागर हे मूळचे कट्टर शिवसैनिक. क्षीरसागर यांना काही प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, पण तो उघडपणे दिसत नाही. आबिटकर यांनाही फारसा विरोध होताना दिसत नाही, याचा अर्थ त्यांनाही मतदार किंवा शिवसैनिकांचा पाठिंबा आहे असे दिसते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विरोधातच पक्षाचे सर्व जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे व प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्यातून त्यांच्या विरोधातील धार अधिक तीव्र होताना दिसते.

क्षीरसागर व आबिटकर यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. क्षीरसागर व दोन्ही जिल्हाप्रमुखांत गेल्या काही वर्षांपासून सख्य नाही, त्याचे प्रतिबिंब या आंदोलनात दिसले. माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी तर त्यांचा फलकावरील फोटो फाडला. आबिटकर यांच्या आजरा येथील संपर्क कार्यालयाची काच फोडण्यात आली. तातडीने नाही पण एक दिवस उशिराच या प्रतिक्रिया उमटल्या. यड्रावकर यांच्या विरोधात मात्र शिवसेना थंड आहे. अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. पण पक्षाचे दोन्ही खासदार शिवसेनेसोबत असल्याने त्यांना ताकद मिळाली आहे.

बंड यशस्वी झाले तर क्षीरसागर यांच्याकडील पद कायम राहील, आबिटकर व यड्रावकर यांना मंत्रिपदाची संधी आहे, त्यातून हे तिघेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपापल्या भागात आव्हान उभे करू शकतात.

बंडखोर पुन्हा कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर रिंगणात उतरले तर, यापूर्वीचा कोल्हापूरचा इतिहास पाहता त्यांना विजय सोपा नाही. आबिटकर हे प्रबळ आहेत, पण त्यांना झगडावे लागेल, यड्रावकरांच्या विरोधात सध्या तरी कोणी प्रबळ दिसत नाही, त्यांच्या मतदार संघात जातीचे राजकारण महत्त्वाचे ठरते.

Web Title: Nivas Chaugale Writes Shivsena Kolhapur District Politics Rajendra Patil Yadravkar Ncp Uddhav Thackeray Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..