esakal | 'आपलाही उदयनराजे होईल या भितीने एकही आमदार फुटणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

No one will leave party after udyanraje bhonsle deafet in Satara loksabha bypoll Election

'आपलाही उदयनराजे होईल या भितीने एकही आमदार फुटणार नाही'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत ज्यापद्धतीने उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला, त्या पद्धतीने आपलाही पराभव होईल या भितीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील एकही आमदार फुटणार नाही, असे परखड मत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटरवरून व्यक्त केले आहे. 

विधानसभा निवडणुकीला दहा दिवस लोटले तरी राज्यातील सत्तास्थापनेचा निर्णय अधांतरीच आहे. भाजपा-शिवसेनेत वाटाघाटीवरून तिढा लांबत चालला असून, बहुमत सिद्ध करण्यासाठी घोडेबाजार होऊ शकतो असे मानले जात असताना ही शक्यता सत्यजित तांबे यांनी फेटाळून लावली आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपा-शिवसेना युतीचं सरकार स्थापन होईल असे चित्र होते. पण, सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा वाटेत शिवसेनेने अडथळा निर्माण केला आहे.

राज्यात नवीन सत्ता समिकरणं उदयाला येत असताना आमदारांचा घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे भाजपाकडून आमदारांवर दबाव आणण्याचं काम केलं जात आहे, असा आरोपही शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ही शक्यता तांबे यांनी नाकारली आहे.

दरम्यान, शिवसेना आपल्या 50-50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम असून, भाजप ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. तसेच, दुसरीकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नसल्यानं 105 आमदार असूनही भाजपलाही सत्ता स्थापन करता येत नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढतच चालला आहे.