सोलापूरच्या पोराची यशोगाथा; नववीत "नापास'चा शिक्का, आता त्याच इयत्तेच्या पुस्तकात धडा ! 

प्रकाश सनपूरकर 
Thursday, 6 August 2020

हालचालींतून होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी फिजिओथेरपिस्टनी उपचार सुरू केले. वेदनांचे प्रमाण कमी करण्यासाठी मसाजसोबत भरपूर विश्रांती व हालचालींवर मर्यादा याचा उपयोग केला. डॉक्‍टरांनी त्यांना पुढील काळात त्यांच्यासाठी निरोगी जीवन असणार नाही, असा सल्ला दिलेला होता. या भीतीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मेडिटेशनचा उपयोग केला. त्यांनी घरात सायकलिंग व इतर व्यायाम सुरू केले. पूर्वी हात जमिनीवर ठेवून त्यावर वजन घालणे शक्‍य नव्हते, आता ते नियमित डिप्स मारत आहेत. आता मणक्‍यांच्या वेदना संपुष्टात आल्या आहेत. नियमित सरावाने ते आता पुन्हा ट्रेकिंगचे ओझे पाठीवर घेऊन ट्रेकिंग करू शकतील. आता लॉकडाउन संपताच "मिशन बिगीन अगेन' करणार असून, दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर माउंट ऍकांटागुआ हे शिखर त्यांच्या 360 एक्‍स्प्लोअर ग्रुपच्या मदतीने सर करण्याचा निर्धार केला आहे. 

सोलापूर : सोलापूरचे माउंट एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे... जागतिक गिर्यारोहण मोहिमेत मोठी कामगिरी करणाऱ्या आनंद बनसोडे यांचा इयत्ता नववीच्या हिंदी पाठ्यपुस्तक "कुमारभारती'मध्ये समाविष्ट झालेला पाठ त्यांच्या कार्याची वेगळी ओळख करून देणारा ठरला आहे. संशोधन व गिर्यारोहण क्षेत्रातील उत्तुंग यशाला गवसणी घालत असताना त्यांच्या जीवनातील प्रेरणा विद्यार्थ्यांसमोर या पाठातून आल्या आहेत. 

हेही वाचा : सावधान! सोलापूर जिल्ह्यातील "या' तालुक्‍यात बिबट्याचा वावर 

मणक्‍यांचा आजार सोबत घेऊनच केले "कळसूबाई' सर 
सोलापूर शहरातील आनंद बनसोडे हे जागतिक गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा स्वतःचा 364 जणांचा ट्रेकिंग ग्रुप आहे. आनंद बनसोडे यांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीत 19 नोव्हेंबर 2012 रोजी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले. यापूर्वी त्यांनी टी-टू शिखर, माउंट शासता, माउंट आयलॅंड, हायेस्ट माउंटन अशी कितीतरी शिखरे सर केली आहेत. त्यांनी भारतीय टीमसमवेत ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर सर केले. जून 2015 मध्ये अलास्का या उत्तर अमेरिकेत चढाई करत असताना अचानक त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याची घटना घडली. त्याचसोबत आनंद बनसोडे यांना मणक्‍यांचा आजार जडला. या आजारावर शस्त्रक्रिया केली तर ती यशस्वी होण्याची खात्री नसते. अशा स्थितीत मागील पाच वर्षांपासून त्यांनी सहा महिने बेडवर झोपून काढले. नंतर त्यांनी स्वतःला उपचारासाठी तयार करत फिजिओथेरपी व मेडिटेशनचा उपचार सुरू केला. मणक्‍यांचे ऑपरेशन न करता त्यांनी हा पर्याय स्वीकारला. आजाराच्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्याही स्थितीत कळसूबाई शिखर सर करण्यासाठी मणक्‍यांवर ताण न देता पायाच्या हालचालींवर भर देत त्यांनी हे शिखर सर केले. 

हेही वाचा : अरारा..! "या' शहरातील शांतता कमिटीतच अशांतता पसरविणारे सदस्य 

लॉकडाउन संपताच "मिशन बिगीन अगेन'! 
हालचालींतून होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी फिजिओथेरपिस्टनी उपचार सुरू केले. वेदनांचे प्रमाण कमी करण्यासाठी मसाजसोबत भरपूर विश्रांती व हालचालींवर मर्यादा याचा उपयोग केला. डॉक्‍टरांनी त्यांना पुढील काळात त्यांच्यासाठी निरोगी जीवन असणार नाही, असा सल्ला दिलेला होता. या भीतीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मेडिटेशनचा उपयोग केला. त्यांनी घरात सायकलिंग व इतर व्यायाम सुरू केले. पूर्वी हात जमिनीवर ठेवून त्यावर वजन घालणे शक्‍य नव्हते, आता ते नियमित डिप्स मारत आहेत. आता मणक्‍यांच्या वेदना संपुष्टात आल्या आहेत. नियमित सरावाने ते आता पुन्हा ट्रेकिंगचे ओझे पाठीवर घेऊन ट्रेकिंग करू शकतील. आता लॉकडाउन संपताच "मिशन बिगीन अगेन' करणार असून, दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर माउंट ऍकांटागुआ हे शिखर त्यांच्या 360 एक्‍स्प्लोअर ग्रुपच्या मदतीने सर करण्याचा निर्धार केला आहे. 

आनंद बनसोडे यांची लिखित पुस्तके 

  • स्वप्नातून सत्याकडे 
  • स्टेपिंग स्टोन टू सक्‍सेस 
  • स्वप्नपूर्तीचा खजिना 
  • ध्यास उत्तुंग हिमशिखरांचा 

भीती संपली अन्‌ आजारही संपला 
मनाची भीती काढण्याचा सराव करत असताना, त्यांना भीतीने आजाराचे गांभीर्य वाढते, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःला मेडिटेशन व इतर ऍक्‍टिव्हिटीमध्ये गुंतवले. मनावरचा ताण कमी होत असताना शरीराच्या क्षमता देखील वाढत होत्या. भीती जसजशी कमी होत गेली तसे ते बरे होत गेले. आता ते सामान्य स्थितीत पूर्वीप्रमाणे काम करू लागले आहेत. 

नववीत फेल झाला पण नववीच्या पुस्तकातच आनंद यांचा धडा! 
आनंद बनसोडे यांच्या नववीचा संदर्भ अत्यंत वेगळा आहे. शाळेत शिकत असताना नववी इयत्तेत ते अनुत्तीर्ण झाले. तेव्हा शिक्षकांनी त्यांच्या आईला बोलावून या प्रकाराची माहिती दिली. या प्रकाराने त्यांच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. केवळ या एका प्रसंगाने त्यांचे आयुष्य बदलले. पुढे त्यांनी शिक्षणात मागे वळून न पाहता थेट पदव्युत्तर शिक्षण व संशोधनापर्यंत मजल मारली. त्यानंतर जागतिक स्तरावर गिर्यारोहण व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दिलेली भाषणे, प्रेरणादायी पुस्तकांचे लेखन अशी त्यांच्या यशाची मालिका घडली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातील एक पाठ आता इयत्ता नववीच्या हिंदी "कुमारभारती' पुस्तकामध्ये समाविष्ट झाला आहे. त्यांच्या आयुष्यातील अपयश व यशाचे हे दोन्ही प्रसंग या नववी इयत्तेशी जोडले गेले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the lesson of the child who failed in the ninth grade is in the same ninth grade textbook