ration card
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : रेशनधान्य दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंबातील लाभार्थींना दरमहा पाच किलो धान्य मोफत मिळते. तरीपण, सोलापूर शहर- जिल्ह्यातील २२ हजार ८०० लाभार्थींनी सहा ते १२ महिने झाले धान्यच घेतलेले नाही. त्यांची शहरात पुरवठा निरीक्षक आणि ग्रामीणमध्ये तलाठ्यांमार्फत मिशन सुधार पडताळणी झाली. या लाभार्थींपैकी अनेकांची आर्थिक स्थिती सुधारल्याने त्यांना रेशनधान्याची गरज नाही, काहीजण स्थलांतरित झाले तर काहीजण मयत आहेत. त्यामुळे त्यांचा लाभ आता कायमचाच बंद होणार आहे.
रेशनकार्डसाठी ज्यावेळी आधारकार्ड जोडण्याची अट घालण्यात आली, त्यावेळी रेशनधान्य दुकानदारांनी अंदाजे जन्मतारखा टाकल्या होत्या. त्या व्यक्तींचे वय आता १०० पेक्षा जास्त दिसत आहे. विशेष म्हणजे, १०० वर्षांनंतरही १०२ जण नियमित धान्य उचलतात, अशी माहिती पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर दिसते. दुसरीकडे वयाचे १८ वर्षे सुद्धा पूर्ण नाहीत, तरीदेखील ९८ चिमुकली कुटुंबप्रमुख असल्याचेही संकेतस्थळावर दिसत आहे.
तसेच साडेतीन हजारांहून अधिक जणांची नोंद एकापेक्षा जास्त तालुक्यात, जिल्ह्यात दिसत आहे. याशिवाय काही लाभार्थी स्थलांतरित झाल्याने त्यांच्या आधारकार्डवरील पत्ते बदललेले दिसतात. अशा सर्वांची पडताळणी करून त्यांचे धान्य बंद केले जात आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यातील चार हजारांहून अधिक लाभार्थींचे मागील सहा महिन्यांपूर्वी रेशनचे धान्य बंद करण्यात आले आहे. आता पुन्हा २२ हजारांहून अधिक लाभार्थींचे धान्य बंद होणार आहे.
अपात्र लाभार्थींचे धान्य होणार बंद
राज्य शासनातर्फे ‘मिशन सुधार’ राबविले जात आहे. त्यात पूर्वी ज्या कुटुंबप्रमुखांचे वय अंदाजे टाकले त्यांची दुरुस्ती, आधारकार्डवरील चुकीच्या माहितीची पडताळणी, सहा ते १२ महिन्यांपासून धान्य न घेणाऱ्यांची चौकशी आणि एकाच व्यक्तीची एकापेक्षा जास्त रेशनकार्ड असलेल्यांची पडताळणी केली जात आहे. त्यानुसार अपात्र लाभार्थींचे धान्य बंद केले जात आहे.
- ओंकार पडोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर शहर
प्रतिमाणसी ५ किलो धान्य मोफत
अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा शासनाच्या वतीने ५ किलो धान्य मोफत दिले जाते. त्यात तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ आहे. रेशन दुकानांमधून धान्य मोफत मिळत असताना देखील अनेकांनी सहा ते १२ महिने झाले तरी रेशनधान्य दुकानांमधून धान्यच घेतलेले नाही.
जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांची स्थिती
१०० वर्षांवरील कुटुंबप्रमुख
१०२
१८ वर्षांखालील कुटुंबप्रमुख
९८
संशयित आधारकार्ड
४,७००
६ ते १२ महिने धान्य न घेतलेले
१३,८००
एकापेक्षा जास्त रेशनकार्ड
४,३००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.