राज्यात कर्करुग्णांच्या संख्येत वाढ

निखिल पंडितराव - सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 February 2017

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव; तंबाखू सेवनामुळे धोका

कोल्हापूर - जंक फूडचे वाढते प्रमाण, क्षारयुक्त प्रदार्थांचे अधिक सेवन, रासायनिक खतांचा वाढता वापर आदी कारणांमुळे राज्यात कर्करोग रुग्णांत वाढ होत चालली आहे. जीवनशैलीतील बदल आणि व्यायामाच्या अभावामुळेही ही स्थिती तयार झाली आहे. 30 ते 50 वयोगटांतील पुरुष व महिलांना याचा धोका अधिक असल्याचे एका पाहणीतून पुढे आले आहे. जागतिक कर्करोग दिनानिमित्त "इंडस हेल्थ प्लस'ने केलेल्या पाहणीतून ही बाब पुढे आली आहे.

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर गर्भाशय, अंडाशय, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाणही लक्षणीय आहे. "जेएमडी इंडस हेल्थ प्लस'चे अमोल नायकवडी म्हणाले, ""धूम्रपान आणि नियमित मद्यपान फुफ्फुसाचा आणि घशाच्या कर्करोगाचा धोका वाढवतात. शहरी व ग्रामीण भागातील 45 ते 65 वयोगटांतील लोकांना याचा धोका सर्वाधिक असतो. कर्करोग टाळण्यासाठी जीवनशैलीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण हेंद्रे म्हणाले, ""कर्करोगाचा धोका आपल्या चुकीच्या सवयींमुळे अधिक बळावण्याची शक्‍यता असते. रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेल्या पदार्थांचे सेवन अधिक केल्यास कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. या पार्श्‍वभूमीवर सेंद्रिय शेतीचे पदार्थ खाण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे हा आजार अधिक बळावतो. कर्करोग होण्याची विविध कारणे असली तरी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हेही मुख्य कारण आहे. कर्करोगावर उपचारासाठी सध्या नवीन औषधे व नवीन तंत्रज्ञान आले आहे. "नॅनो टेक्‍नॉलॉजी'चा वापर आता होऊ लागला आहे.

"इंडस हेल्थ प्लस'च्या सर्वेक्षणानुसार...
- भारतात 12 ते 14 लाख नवीन रुग्ण दरवर्षी आढळतात
- 55 ते 65 वयोगटांत कर्करोगाची वाढ अधिक
- महिलांमध्ये स्तनाच्या व गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक
- पुरुषांमध्ये डोके, मान, तोंडाचा व फुफ्फुस कर्करोग अधिक
- वाढता स्थूलपणा हा धोका

कर्करोग टाळण्यासाठी हे करा...
- धावणे, जीम, झुंबा, योगा, चालणे, सायकल चालवणे, खेळणे यांसारखे व्यायाम करा
- आहारात फळे, सॅलेड, हिरव्या भाज्यांचा वापर वाढवा
- सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांना अधिक प्राधान्य द्या
- धूम्रपान, मद्यपान दूर ठेवा
- प्रदूषणापासून स्वतःला लांब ठेवा
- तंबाखूपासून सर्वाधिक धोका असून त्याचे सेवन बंदच करा
- संतती नियमन गोळ्या, हार्मोन थेरपी यांसारख्या गोष्टींमुळे धोका होऊ शकतो, ते टाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of cancer patients