Municipal Elections Update : महापालिका निवडणुकीचे ईश्‍वराला ठाऊक; फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OBC reservation Devendra Fadnavis statement God knows about municipal elections mumbai

Municipal Elections Update : महापालिका निवडणुकीचे ईश्‍वराला ठाऊक; फडणवीस

मुंबई : इतर मागासवर्ग समाजाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः महापलिका निवडणुकीचा संभ्रम कायम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना महापालिका निवडणूक कधी होईल, हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक असे सांगत महापलिका निवडणुकांबाबत अनिश्चितता कायम असल्याचे स्पष्ट केले.

सध्या महापालिकांवर प्रशासक आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रशासकाने फार काळ संस्था चालविणे योग्य नाही. मात्र, महापालिकांच्या निवडणुकीचा विषय हा राज्य सरकारकडे प्रलंबित नाही. निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. निवडणुका घेण्याचे अधिकार या संस्थेला आहेत. न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीचा विषय हा न्यायालय आणि आयोगाकडे आहे. त्यामुळे महापलिका निवडणुका कधी होतील हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक असल्याचे फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे नीट लक्ष आहे. शेवटच्या पावसापर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांना सात हजार कोटी रुपयांची मदत केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. आमचे सरकार मदत करणारे आहे. आम्ही घोषणा केल्यानंतर एक महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली, असेही फडणवीस म्हणाले. पुन्हा शिवसेनेशी युती होणार का याबाबत फडणवीस यांनी राजकारणात अशक्य काहीच नसते, असे सूचक विधान केले. ‘‘राजकारणात अशक्य काहीच नसते हे खरे असले तरी जर-तरच्या प्रश्नांना देखील राजकारणात उत्तरे नसतात. अशा प्रश्नांना उत्तरे दिल्याने विनाकारण संशयाचे वातावरण निर्माण होते,’’ असे ते म्हणाले.

राजकारणात कटुता वाढली

दरम्यान, अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात कटुता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र, राजकारणात कटुता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. कटुता असेल तर ती सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. पण एक चांगले आहे की सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही संवाद आहे. उद्धव ठाकरे यांना अद्याप दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत पण त्या जरूर देऊ असेही ते म्हणाले.