esakal | पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरू दे! उद्धव ठाकरे यांचे विठ्ठलचरणी साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरू दे! उद्धव ठाकरे यांचे विठ्ठलचरणी साकडे

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरू दे! उद्धव ठाकरे यांचे विठ्ठलचरणी साकडे

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर - बा विठ्ठला... पंढरपुरात (Pandharpur) पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट (Corona Crisis) नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी श्रीविठ्ठलाच्या चरणी घातले. (Ocean of Devotion Fill Pandharpur Once again Uddhav Thackeray)

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्‍मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे, रश्‍मी ठाकरे तसेच वारकरी प्रतिनिधीचा मान मिळालेल्या कोलते दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले,की विठ्ठला, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्या वतीने पाळण्यात येणारे सामाजिक अंतर मिटू दे, वारकऱ्यांनी तुडूंब, आनंददायी, भगव्या पताक्‍यांनी भरलेलं पंढरपूर पहायचे आहे.

पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्‍मिणी मातेची षोडशोपचार पूजा करण्यात आली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; काँग्रेसचे दोन जण 'डेंजर झोन'मध्ये?

मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते (जि. वर्धा) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर रश्‍मी ठाकरे यांच्या हस्ते इंदुबाई केशव कोलते यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना एसटी मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्या वतीने यात्रा अनुदानाचा पाच कोटी रुपये रुपयांचा प्रतिकात्मक धनादेश मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द केला.

श्री विठ्ठल रुक्‍मिणीला आकर्षक पोषाख

आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाला आणि श्री रुक्‍मिणीमातेला घालण्यासाठी खास बंगळुरु येथून आकर्षक रेशमी पोषाख आणण्यात आला होता. विठुरायाला गुलाबी रंगाचे सोवळे, शेला आणि मोती रंगाचा अंगरखा घालण्यात आला तर श्री रुक्‍मिणी मातेस गुलाबी रंगाची भरजरी रेशमी साडी नेसवण्यात आली. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे अर्थात राजस सुकुमाराचे आणि श्री रुक्‍मिणीतेचे रुप अधिकच खुलून दिसू लागले.

loading image