श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या गाभाऱ्यात अधिकाऱ्यांना प्रवेशबंदी; प्रक्षाळ पूजा प्रकरणाची सखोल चौकशी 

अभय जोशी 
Tuesday, 21 July 2020

कार्यालयीन कामास मुभा 
प्रक्षाळपूजेच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी होईपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंदिर समितीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास आणि कामकाज करण्यास मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सकाळ'शी बोलताना दिली. 

पंढरपूर (सोलापूर) : श्रीविठ्ठलाच्या प्रक्षाळ पूजेदिवशी नऊ जुलै रोजी गाभाऱ्यात अधिकाऱ्यांना अंघोळ घालण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करण्याचा निर्णय मंदिर समितीने आज झालेल्या बैठकीत घेतला आहे. समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत श्री विठ्ठल रुक्‍मिणीच्या गाभाऱ्यात जाण्यास बंदी करण्यात आली आहे. 
श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात नऊ जुलै रोजी प्रक्षाळ पूजेदिवशी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या अंगावर पाणी ओतून त्यांना प्रक्षाळ पूजा पूर्ण होण्यापूर्वीच गाभाऱ्यात अंघोळ घालण्यात आली होती. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या वर्तनाची दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी केली होती. 
या पार्श्वभूमीवर आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत प्राधान्याने प्रक्षाळपूजेच्या दिवशी झालेल्या प्रकारासंदर्भात चर्चा झाली. रूढी व परंपरेनुसार प्रक्षाळ पूजा झाली किंवा कसे, याविषयी सखोल चौकशी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पूजेच्या वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह गाभाऱ्यात जे कर्मचारी उपस्थित होते, त्या सर्वांना ही चौकशी पूर्ण होईपर्यंत 
श्री विठ्ठल रुक्‍मिणीच्या गाभाऱ्यात जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन प्रथा परंपराचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. 
कोरोनासारख्या संवेदनशील काळामध्ये मंदिर समितीने चालविलेल्या प्रथा आणि परंपरांची कार्यवाही लक्षात घेता तसेच सर्वच महाराज मंडळी आळंदी-देहू सारख्या संस्थानामध्ये समन्वयाची भूमिका ठेवून आषाढी यात्रा पार पाडल्या बाबत समाधान व्यक्त करण्यात आले. परंतु प्रक्षाळ पूजेदिवशी झालेल्या प्रकाराविषयी नाराजी देखील बैठकीत व्यक्त झाली. यानंतर श्री. जोशी, व्यवस्थापक श्री. पुदलवाड व संबंधित संबंधित कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत श्री विठ्ठल रुक्‍मिणी च्या गाभाऱ्यात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

आजच्या बैठकीत शकुंतला नडगीरे, डॉ, दिनेश कुमार कदम, भास्कर गिरीगुरु किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, आमदार सुजितसिंह ठाकूर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ऍड. माधवी निगडे, प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे, शिवाजीराव मोरे, नगराध्यक्ष साधना भोसले हे सदस्य सहभागी झाले होते. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers barred from entering Sree vitthal Rukmini temple thorough inquiry into Prakshal Pooja case