महिना उलटला तरी एसटीत जुनीच वयोमर्यादा !

ब्रह्मा चट्टे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 60 केली असल्याची घोषणा करून महिना उलटला आहे. तरी, एसटी महामंडळात मात्र तिकीट दराच्या सवलतीसाठी जुनीच वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहक यांच्यामध्ये वाद होत असल्याचे चित्र आहे.

मुंबई: राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 60 केली असल्याची घोषणा करून महिना उलटला आहे. तरी, एसटी महामंडळात मात्र तिकीट दराच्या सवलतीसाठी जुनीच वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहक यांच्यामध्ये वाद होत असल्याचे चित्र आहे.

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये (ता. 11) जुलै रोजी विधानसभेत ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण जाहीर केले अाहे. या धोरणानुसार सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा 65 वरून 60 वर्षे केली आहे. या निर्णयाची चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले असल्याची माहितीही बडोले यांनी विधानसभेत दिली. या घोषणेला महिना उलटून गेला तरीही सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी मात्र एसटी महामंडळाने ज्येष्ट नागरिकाचे वय 65 च ग्राह्य धरलं जात आहे.

निवृती नंतर देव-दर्शनाच्या निमित्ताने धार्मिक पर्यटनासाठी ज्येष्ठांचा अधिक कल असतो. त्यासाठी एसटीचा प्रवास त्यांना सवलतीमध्ये व सोईस्कर असतो. शासन एसटीच्या माध्यमातून समाजातील 24 दुर्बल घटकांना 30 टक्के पासून 100 टक्के पर्यंत तिकिट भाडयात सवलत देते. या सवलतीची रक्कम राज्य सरकार एसटी महामंडळाला देते. शासनाकडून सन 2017-18 या वर्षात एकूण सवलती मुल्यापोटी सुमारे 1383 कोटी रूपये एसटीला येणे बाकी आहे. शासनाने वयोमर्यादा कमी केली असली तरी एसटीने मात्र अजूनही आपले जुनेच धोरण पुढे रेटल्याने सरकारच्या घोषणा पोकळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

ज्येष्ट नागरिकांना एसटीच्या साध्या, रातराणी (परिवर्तन) व निम-आराम (हिरकणी) बसेसमध्ये 50 टक्के , आसन श्रेणीच्या शिवशाही बसमध्ये 45 टक्के तर शयनयान श्रेणीच्या शिवशाहीमध्ये 30 टक्के तिकिट दरात सवलत मिळते.
 
 - सन 2017-18 चे एकूण सवलत धारकांची संख्या 38 कोटी
-  त्यापैकी ज्येष्ट नागरिक 32 कोटी 57 लाख 25 हजार - 
- सवलतीचे मुल्य सुमारे 574 कोटी 85 लाख 

सवलतीची रक्कम राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला मिळते. खर्चाबाबतचा आमचा अहवाल आम्ही सादर केला आहे. शासनाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचे सूचना किंवा आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आम्ही एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकाचे वय हे 65 ग्राह्य धरतो. - दिवाकर रावते, परिवहन मंत्री व अध्यक्ष एसटी महामंडळ

Web Title: Old age limit in ST after one Month