निर्यातबंदीनंतरही कांद्याला भाव 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

निर्यातबंदीनंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अनेक ठिकाणी आवक घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

पुणे -  निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे झालेले नुकसान, त्यामुळे घटलेले लागवड क्षेत्र, उन्हाळ कांद्याची वाढलेली सड, नवीन कांद्याच्या उत्पादनाला होणारा उशीर, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आगाप कांद्याचे पावसामुळे ४० टक्क्यांपर्यंत झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठी सावध चाल तसेच देशांतर्गत असणाऱ्या मागणीमुळे निर्यांतबंदीनंतरही कांदा भाव खाणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. कांदा दर प्रति किलोला ५० रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कमाल ४५९० रुपये दर मिळाला. तर सर्वांत किमान दर प्रतिक्विंटल २०० रुपये सिन्नर बाजार समितीत मिळाला. निर्यातबंदीनंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अनेक ठिकाणी आवक घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक होण्यास साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागेल असा अंदाज कांद्याचे प्रमुख आडतदार विलास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की सध्या महाराष्ट्रातच कांदा कमी असल्याने परराज्यातून आवकेची शक्यता होती. मात्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही पावसाने कांदा भिजला आणि नवी लागवड कमी आहे. त्यामुळे कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पणन मंडळाच्या अंदाजानुसार आगामी हंगामातील खरीप कांद्याची आवक पावसामुळे लांबण्याची शक्यता आहे. साठवणुकीतील कांदा चक्रीवादळात भिजला तर काही प्रमाणात कांदा निर्यात झाला आहे. त्यामुळे आता कांदाच शिल्लक नसल्याने कांद्याचे दर चढे राहतील.

उन्हाळ कांदा दरात सुधारणा असली तरी ७० टक्के कांदा कमी दरात विकला गेला. त्यात उरलेल्या कांद्याचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बरोबरी होईल, अधिक मिळेल असे काही चित्र नाही. 
- विजय पगार, कांदा उत्पादक, कळवण, जि. नाशिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion prices even after export ban