राष्ट्रवादीत रणशिंग फुंकले! ‘या’ निवडी लवकरच होणार; इच्छुकांकडून मागविले अर्ज

अशोक मुरुमकर
Wednesday, 24 June 2020

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची निवड लवकरच होण्याची चिन्हे आहेत. यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. आलेल्या अर्जातून योग्य उमेदवाराला प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.

सोलापूर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची निवड लवकरच होण्याची चिन्हे आहेत. यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. आलेल्या अर्जातून योग्य उमेदवाराला प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेत काही दिवसांपूर्वी ऑनलाईन नाव नोंदवण्यासाठी आवाहन केले होते. www.ncp.org.in या संकेतस्थळावर ही नोंदणी केली जात होती. राज्यभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. यात महाराष्ट्रातून सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांनी सदस्य म्हणून नोंदणी केली. आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यासाठी उच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज mail.nationaliststudentcongress@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांनी केले आहे.  आलेल्या अर्जातून योग्य निवडक उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवले जाणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. याचे ट्विट त्यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील अजिंक्यराणा पाटील यांनी यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. फेब्रुवारीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. या पदावर काम करण्याचा अनुभव आनंददायक होता. यावेळी काम करत असताना ज्येष्ठ नेत्यांसोबतच संघटनेतील सर्व सहकाऱ्यांनी उत्तम साथ दिली. या पदावर मला संधी दिली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरद पवार यांचा मनापासून ऋणी असेल्याचे त्यांनी सांगितले होते. विरोधी बाकावर असताना अडीच वर्षाच्या आसपास काम करण्याची संधी मिळाली, या काळात मला दिलेली जबाबदारी मी सर्वतोपरी पार पाडली आहे असं मला वाटतं, आज आपला पक्ष सत्तेत आलेला आहे आता पुढील काळात नव्या व्यक्तीला संधी देण्यात यावी अशी पाटील यांनी इच्छा व्यक्त करत पुढील काळात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारत राष्ट्रवादीचा  प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत राहील, असं त्यांनी त्यांच्या फेसबुकच्या वॉलवर म्हटलं होतं.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online application called for State President of Nationalist Student Congress