esakal | Be Alert :तुम्हाला लिंक-पोस्ट, कॉल येतोय
sakal

बोलून बातमी शोधा

Be Alert :तुम्हाला लिंक-पोस्ट, कॉल येतोय

Be Alert :तुम्हाला लिंक-पोस्ट, कॉल येतोय

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: सध्या कोरोनामुळे लॉकडाउन(lockdown)असल्यामुळे अनेकजण अधिक वेळ ऑनलाईनवर राहतात. अशाच वेळी लिंक किंवा कॉल(Link, call)येत आहेत. त्याला चटकन रिप्लाय दिला जात आहे. काही वेळा अनपेक्षित रिप्लाय दिला जात आहे; मात्र ही फसवणूक आहे. एखाद्या लिंकवरील माहिती भरल्यानंतर किंवा रिप्लाय दिल्यानंतर कळून किंवा पश्‍चाताप होऊन उपयोग नाही. दरम्यानच्या काळात तुमची फसवणूक झालेली असते. अशी फसवणूक झाल्यास किंवा फसवणुकीचा प्रयत्न झाल्यास संबंधितांनी तत्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलशी किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे इतरांची फसवणूक थांबविता येईल. (online-forward-offers-and-cheating-fraud-case-crime-marathi-news)

तुमच्या सीम कार्डची केवायसी मिळालेली नाही, कार्ड बंद करणार आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड यांसह इतर माहिती द्या, अन्यथा तुमचे नेटवर्क बंद केले जाईल. कोल्हापुरातील उच्चशिक्षित व्यक्तीला हा कॉल आला. त्यांना काहीच कळाले नाही. कामाच्या व्यापात केवायसी राहिली असल्याचे त्यांना वाटले; पण त्यांनी थांबून पुन्हा विचार केला. वर्षभरापूर्वीच कंपनीच्या कार्यालयात जाऊन केवायसी दिल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याच दिवशी पुन्हा पुन्हा येणारा कॉल घेतलाच नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा कॉल आल्यावर उलट तपास घेतल्यावर तो कॉल फेक असल्याचे स्पष्ट झाले. ही सायबर फसवणूक टळली; पण असे कॉल कोणा कोणाला आले, त्यांनी किती माहिती दिली याचा अंदाजही येत नाही.

मोटार उत्पादन कंपनीत आघाडीच्या आणि जगप्रसिद्ध असलेल्या ब्रॅण्डचे नाव घेऊन मोबाईलवर व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून एक लिंक व्हायरल झाली. अनेकांनी ती फॉरवर्ड केली. कमी किमतीत मोटारी देण्याची ऑफर होती. त्यासाठी तुमची माहिती देण्याची गरज होती. प्रत्यक्षात ही लिंक ज्यांनी पुढे व्हायरल केली होती त्यांनी ती फेक असल्याचीही पोस्ट केली. प्रत्यक्षात दरम्यानच्या काळात अनेकांनी या लिंकवर माहिती भरली असेल तर ?

हेही वाचा- मुंबईच्या महिला वकिलाची 15 लाखांची फसवणूक; तोतया डॉक्टला अटक

सोशल मीडियावरील ऑफर किंवा आमिष दाखविणाऱ्या पोस्ट, एसएमएस या गोष्टी इतरांना फॉरवर्ड करू नयेत. तुम्ही खात्री केली असली तरच ते इतरांना पाठवा. अन्यथा लिंक, पोस्टकडे दुर्लक्ष करा. अशा लिंक फॉरवर्ड करणाऱ्यांना रिप्लाय देऊन ‘त्या’ पोस्ट करू नका म्हणून सांगा. ऑफर, आमिषाची पोस्ट वाचल्यानंतर बारकाईने त्या पाहिल्‍यास लक्षात येतात. अशा लिंकवर, पोस्टवर तातडीने रिप्लाय देऊ नये.

-श्रीकांत कंकाळ, पोलिस निरीक्षक, सायबर सेल

loading image
go to top