

तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या २७७५ शाळांमध्ये ८७०० शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी अवघे १२३१ शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असल्याची माहिती समोर आली आहे. १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक नव्हती, त्यामुळे तेव्हाचे शिक्षक शैक्षणिक पात्रतेवर नोकरीला लागले. मात्र, १ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ५३ वर्षांखालील सर्व शिक्षकांना दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. त्यानुसार उतारवयातील साडेसात हजार शिक्षकांना मुदतीत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई होणार आहे.
जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हजारो पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घेत आहेत. त्यातून दरवर्षी अनेक शाळांची पटसंख्या कमी होऊन शिक्षक अतिरिक्त होऊ लागले आहेत. यावर्षी १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यता झाल्या आहेत. पटसंख्येअभावी आगामी शिक्षक भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला एकही नवीन शिक्षक मिळणार नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्णची अट घातली आहे.
न्यायालयाची मुदत १ सप्टेंबर २०२७ रोजी संपणार आहे. मुदतीपूर्वी शिक्षकांना पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या सहा संधी मिळणार आहेत. त्यानुसार चालू वर्षात जुलै आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येकी दोन परीक्षा होतील. त्यानंतर २०२७ मध्ये जून-जुलैपर्यंत प्रत्येकी एक-एक परीक्षा होईल. अशा सहा संधीत शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाकडून त्या शिक्षकांवर कारवाई अटळ आहे. त्यात खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता आठवीपर्यंतच्या वर्गांवरील नियुक्त शिक्षकांचाही समावेश असणार आहे.
त्या शिक्षकांनाही पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागेल
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांची माहिती शालेय शिक्षण विभागाला पाठविली आहे. एकूण साडेआठ हजार शिक्षकांपैकी १२३१ शिक्षक ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेले आहेत. ज्या शिक्षकांना सेवानिवृत्तीसाठी पाच वर्षे शिल्लक आहेत, ते वगळून बाकीच्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन वर्षात ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
सोलापूर झेडपी शाळांची स्थिती
एकूण शाळा
२,७७५
कार्यरत शिक्षक
८,७००
‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षक
१,२३१
‘टीईटी’ नसलेले शिक्षक
७,४६९
३८ शाळा मुख्याध्यापकाविना
शिक्षकांना पदोन्नती देण्यासाठी देखील ‘टीईटी’चे बंधन आहे. त्यामुळे शिक्षकांमधून केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी यांना पदोन्नती देता आलेली नाही. याशिवाय सोलापूर जिल्हा परिषदेच्या ३८ शाळांना नियमित मुख्याध्यापक नाही. आगामी काळात ही संख्या आणखी वाढू शकते. ‘टीईटी’ उत्तीर्ण सेवाज्येष्ठ शिक्षकच उपलब्ध नसल्याचे अधिकारी सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.