
तात्या लांडगे
सोलापूर : काम सोडून पती गावातच हातभट्टी पिऊन पडतोय, घरी आला की सतत भांडण करतो, घरखर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देत नाही, अशा त्रासाला कंटाळून गावागावांतील विवाहिता माहेरी निघून गेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेक महिलांनी घटस्फोटासाठी देखील अर्ज केले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ५४ ठिकाणी अवैध हातभट्ट्यांचे अड्डे आहेत. त्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक ११, उत्तर सोलापूर आणि माळशिरस तालुक्यात प्रत्येकी नऊ, अक्कलकोट तालुक्यात सहा आणि करमाळा तालुक्यात सात ठिकाणी हातभट्टी तयार करण्याचे अड्डे असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीच संकलित केली आहे. गावागावातील महिलांच्या कुटुंबात हातभट्टीमुळे विघ्न निर्माण झाले आहे, गावातील लोक पोलिसांना निवेदने देत आहेत. गावांनी दारूबंदीचे ठरावसुद्धा केले, तरीपण ना हातभट्ट्यांवर छापे ना हातभट्टी विक्रेत्यांवर कारवाई. दारू महागल्याने सोलापूर जिल्ह्यात दररोज हजारो लिटर हातभट्टी बनवून गावागावात पोच केली जात आहे.
तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवरील छापेमारीत दीड लाख लिटर हातभट्टी आणि २० लाखांहून अधिक लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट करण्यात आले आहे. तरीपण, हातभट्ट्यांवर छापे टाकले जात नाहीत हे विशेष. चिमुकल्यांचे शिक्षण अर्ध्यातून सोडून विवाहिता माहेरीच रहायला आहेत. पत्नी माहेरी आहे, नांदायला येत नाही म्हणून तो तरुण हातभट्टीचे अतिसेवन करीत असल्याचे चित्र गावागावांत आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक श्री. पाटील यांच्याकडून विवाहितांना खूप अपेक्षा आहेत.
सोलापूर जिल्ह्यात येथे बनते अवैध हातभट्टी
दक्षिण सोलापुरातील तिल्लेहाळ, दोड्डी, उळेवाडी, गुरप्पा, मुळेगाव, वडजी, शिवापुढारी, सीताराम या तांड्यांसह बक्षिहिप्परगा व वरळेगाव या ठिकाणी दरवर्षी लाखो लिटर हातभट्टी तयार होते. याशिवाय उत्तर सोलापुरातील कोंडी, गुळवंची, तिऱ्हे, सेवालाल, कवठे, भोजप्पा व घोडा तांडा, खेड व शिवाजीनगर, अक्कलकोटमधील कलकर्जाळ, कोर्सेगाव, तडवळ, मुंढेवाडी, बासलेगाव, नागोर तांडा, बार्शीतील भातंबरे तांडा, पंढरपुरातील देगाव, लक्ष्मी टाकळी व वाखरी व करमाळ्यातील सर्पडोह, करमाळा, भाळवणी, जिंती- पारेवाडी, हिंगणी, वांगी, केत्तूर, मोहोळ तालुक्यातील बेगमपूर व भांबेवाडी येथे देखील हातभट्ट्या आहेत. माळशिरसमधील कुरभावी, गुरसाळे, धर्मपुरी, चांदापुरी, चंद्रपुरी, विजोरी, चव्हाणवाडी, सवतगव्हाण पारधी वस्ती, पिलीव सांगोल्यातील पाचेगाव खु., हतीद, वाकीशिवणे, महीम, चिकमहूद व महूद यासुद्धा खुलेआम हातभट्टी तयार होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.