प्रियंका गांधी यांनी ट्विट करत साधला भाजपवर निशाणा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

सध्या भाजपने सुरु केलेल्या राजकीय घडामोडीॆना सर्वच स्तरातून विरोध होत आहे. यावरूनच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारला महाविकासआघाडीने जोरदार विरोध केला आहे. सध्या भाजपने सुरु केलेल्या राजकीय घडामोडीॆना सर्वच स्तरातून विरोध होत आहे. याच निमित्ताने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. 

सध्या सत्तासंघर्षाबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत तोंडघशी पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. 

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर टीका केली आहे. जनादेशाच्या खुल्या अपहरणाच्या युगात आपण पोहोचलो आहोत की काय? असा सवाल प्रियंका यांनी केला आहे. भाजपाने महाराष्ट्रात देशाची राज्यघटना व घटनात्मक संस्थांना ठेंगा दाखवून कर्नाटकातील सत्तेच्या खेळाची पुनरावृत्ती सुरू केली आहे, असं टीव्हीवर पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्यासाठी भाजपा सरकारच्या खिशातून कधी मदत निघाली नाही असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपावर निशाणा साधला होता. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे देशातील तरुण आहेत. भाजपा सरकारने त्यांच्याकडून नोकऱ्यांची संधी हिरावून घेत मोठा अन्याय केला आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं होतं. तसेच देशात रोजगारनिर्मिती थांबणे हे विकास ठप्प झाल्याचे द्योतक असल्याची टिकाही केली होती.

तसेच भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे देशातील तरुण आहेत. भाजपा सरकारने त्यांच्याकडून नोकऱ्यांची संधी हिरावून घेत मोठा अन्याय केला आहे असं देखील म्हटलं होतं. महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याला वेगळं वळण लागलं असून, आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालय उद्या त्यावर निर्णय देणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open Kidnapping of Mandate says Priyanka Gandhi Says BJP Disregarding Constitution in Maharashtra