‘सुरत-चेन्नई’ महामार्गाला विरोध! गावठाण जागेला शेतीचा नको, चौरस मीटरचा हवा दर; वैरागच्या ट्रम्पेटला शेतकऱ्यांचा विरोध

सुरत-चेन्नई एक्सप्रेस-वेसाठी संपादित जमिनीपैकी गावाशेजारील जमिनींनाही शेतीचाच दर देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसान होत आहे. लक्ष्याचीवाडी (ता.बार्शी) व नागणहळ्ळी, उमरगे (ता.अक्कलकोट) या गावच्या शेतकऱ्यांनी प्रतिचौरस मीटर दर आकारणीचा आग्रह धरला आहे.
trumpet
trumpetsakal

सोलापूर : सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी गावाशेजारील जमिनींनाही शेतीचाच दर देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसान होत आहे. लक्ष्याची वाडी (ता.बार्शी) व नागणहळ्ळी व उमरगे (ता. अक्कलकोट) या गावच्या शेतकऱ्यांनी प्रतिचौरस मीटर दर आकारणीचा आग्रह धरला आहे. याच मुद्द्यावरून वैराग येथील ट्रम्पेटला विरोध होत असून ट्रम्पेट रद्द झाले तर चार तालुक्यांचे नुकसान होणार आहे.

सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेच्या भूसंपादनाचे काम ज्या वेगाने झाले त्याच वेगाने त्याला विरोध होत आहे. अद्याप केवळ बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी मोबदला स्वीकारला असून इतर शेतकऱ्यांना मोबदल्याचे दर मान्य नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीला कवडीमोल दर आल्याने शेतकरी जमिनीचा मोबदला स्वीकारण्यास पुढे येत नाहीत. असे असताना ज्या गावांच्या शेजारून हा महामार्ग गेला आहे. त्या शेतकऱ्यांच्या जमिनी या गावापासून २०० मीटरच्या आत असल्याने त्यांचा दर चौरस मीटरप्रमाणे आकारावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील लक्ष्याची वाडी व अक्कलकोट तालुक्यातील नागणहळ्ळी व उमरगे या गावांचा समावेश आहे.

लक्ष्याची वाडी तर शहरालगत

बार्शी तालुक्यातील लक्ष्याची वाडी हे गाव बार्शी-परंडा रस्त्यावरील पहिले गाव आहे. हे गाव बार्शी शहराजवळ असल्याने यापूर्वी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे बिगर शेतीकरण होऊन नकाशे तयार झालेले आहेत. यामुळे येथे यापूर्वीच गुंठेवारी सुरू झालेली आहे. मात्र, या एक्सप्रेसवेसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी ज्या शेतकऱ्यांचे नकाशे तयार नाहीत त्यांच्या जमिनीला हेक्टरप्रमाणे शेतीचाच दर देऊ करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

महत्त्वाच्या ट्रम्पेटला मोबदल्यावरून विरोध

सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेवर ये-जा करण्याची सुविधा म्हणजे ट्रम्पेट होय. हा महामार्ग ज्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याला छेद देणार आहे. याच ठिकाणी ट्रम्पेट तयार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात हसापूर, तांदुळवाडी, केगाव, वैराग व अलिपूर रोड-बार्शी या ठिकाणी ट्रम्पेट प्रस्तावित आहेत. यातील अत्यंत महत्त्वाचे ट्रम्पेट हे वैरागजवळील आहे. कारण या ठिकाणी सध्या तुळजापूर-वैराग रस्ता असून जवळच बार्शी-सोलापूर रस्ताही आहे. येथेच प्रस्तावित नागपूर-गोवा महामार्गाचे क्रासिंग आहे. हे ट्रम्पेट वैराग परिसराचा कायापालट करणार असून एकाचवेळी चार तालुक्याला फायदा होणार आहे. बार्शी, मोहोळ, माढा व तुळजापूर तालुक्याची कनेक्टव्हिटी ट्रम्पेटमुळे वाढणार आहे. येथेही मोबदला वाटपावरून विरोध होत आहे.

विरोध असला तरी लेआऊटमध्ये बदल नाही

जमिनीचे दर ठरविण्याचा अधिकार मूल्यांकन विभागाचा आहे. मूल्यांकन विभागकडूनच जमिनीचे दर ठरविले जातात. वैराग परिसरात ट्रम्पेटला विरोध होत असला तरी लेआऊटमध्ये बदल केला जाणार नाही. त्याचे अधिकार केंद्र सरकारच्या हातात आहेत.

- अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी

चौरस मीटरमध्ये मोबदला मिळणे आवश्यक

नागणहळ्ळी येथील गट नं.९० मधील काही जमिनीचे सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेसाठी संपादन करण्यात आले आहे. ही जमिनी गावठान हद्दीपासून २०० मीटरच्या आत असून हॉटेल, धाबा, पट्रोलपंपसाठी योग्य आहे. त्याचे बिगरशेती रुपांतर झालेले असल्याने चौरस मीटरमध्ये मोबदला मिळणे आवश्यक आहे.

- अजीम पिरजादे, नागणहळ्ही ता. अक्कलकोट

गावठाणच्या जमिनीचे बिगरशेती करण्याची गरज नाही

शासनाच्या नियमाप्रमाणे गावठाणपासून २०० मीटरच्या जमिनीचे बिगर शेती करण्याची गरज नाही. मात्र, सुरत-चेन्नई महामार्गासाठी संपादित केलेल्या लक्ष्याची वाडी येथील जमिनीचे नकाशे तयार नाहीत म्हणून शेतीच्या दराप्रमाणे मोबदला आकारणी करण्यात येत आहे. या जमिनीचा मोबदला चौरसमीटरच्या दराप्रमाणे मिळावा.

- सागर कांबळे, लक्ष्याची वाडी ता. बार्शी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com