पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. प्रथम भाषा असणाऱ्या विषयापासून परीक्षेला सुरवात होणार आहे. राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधून दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील पाच हजार १३० मुख्य परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
यंदा आठ लाख ६४ हजार १२० विद्यार्थी, सात लाख ४७ हजार ४७१ विद्यार्थिनी आणि १९ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीची परीक्षा १७ मार्चपर्यंत असणार आहे. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहून नये, म्हणून गुरुवारपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तपास अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पोचणे आवश्यक आहे.
त्यानुसार सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता, तर दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. गेल्यावर्षीप्रमाणे या परीक्षेतही पेपरच्या नियोजित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहे. राज्य मंडळातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. यावेळी सचिव देविदास कुलाळ उपस्थित होते.
मंडळाने नियोजित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय किंवा अन्य अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लेखी परीक्षेनंतर १८ ते २० मार्च या कालावधीत ‘आउट ऑफ टर्न’ने आयोजित केली आहे.
विभागीय मंडळनिहाय विद्यार्थी संख्या -
पुणे : २,७५,००४
नागपूर : १,५१,५०९
छत्रपती संभाजीनगर : १,८९,३७९
मुंबई : ३,६०,३१७
कोल्हापूर : १,३२,६७२
अमरावती : १,६३,७१४
नाशिक : २,०२,६१३
लातूर : १,०९,००४
कोकण : २७,३९८
एकूण : १६,११,६१०