esakal | राज्यातील 25 साखर कारखान्यांनी दिली ऑक्‍सिजन प्लॅंटची ऑर्डर ! 25 मेदरम्यान होईल निर्मिती सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Plant

राज्यातील 25 साखर कारखान्यांनी दिली ऑक्‍सिजन प्लॅंटची ऑर्डर ! 25 मेदरम्यान होईल निर्मिती सुरू

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : कोव्हिडच्या (Covid-19) भयंकर महामारीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर ऑक्‍सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी राज्यातील 25 साखर कारखान्यांनी ऑक्‍सिजन निर्मितीचा निर्णय घेतला असून, प्लॅंटची (Oxygen Plant) ऑर्डर दिली आहे. हे सर्व प्लॅंट तैवान व चीनमधून आयात केले आहेत. त्यामुळे ते येण्यास विलंब होत आहे. तरीही प्रत्यक्ष ऑक्‍सिजन उत्पादन 25 मेच्या दरम्यान सुरू होईल, असा विश्वास साखर उद्योगातून व्यक्त केला जात आहे. आणखी 25 कारखान्यांकडून ऑक्‍सिजन प्लॅंटची ऑर्डर दिली जाण्याची शक्‍यता आहे. (Oxygen plants ordered by twenty five sugar factories in the state)

सध्याच्या कोरोनाच्या तांडवात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत आहे. जगातील सर्व उच्चांक मोडून देशातील दररोजची कोरोना बाधितांची संख्या चार लाखांवर पोचली आहे. मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. ग्रामीण व निमशहरी भागात ऑक्‍सिजनअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. उपलब्ध ऑक्‍सिजन निर्मिती व पुरविण्याची संसाधने तोकडी पडत आहेत. ऑक्‍सिजन पुरवठा करण्यामध्ये वैद्यकीय यंत्रणा व शासन हतबल झाले आहे.

हेही वाचा: "पूर्वग्रह बाळगून मराठा समाजाला सापत्न वागणूक ! सरकारला परिणाम भोगावे लागतील'

राष्ट्रीय आपत्तीच्या प्रसंगी संपूर्ण साखर उद्योग, प्रामुख्याने महाराष्ट्रातील साखर उद्योग नेहमीच अग्रेसर राहिला आहे. गतवर्षी कोव्हिडच्या प्रारंभी सॅनिटायझरचे भाव गगनाला भिडले होते. त्यावेळी साखर उद्योगाने सॅनिटायझर निर्मिती करून अल्प किंमतीत मोठ्या प्रमाणावर ते उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.

सध्या ऑक्‍सिजनच्या तुटवड्यामुळे हजारो रुग्णांचे प्राण जात असताना साखर उद्योग स्वस्थ बसू शकत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगास ऑक्‍सिजन निर्मिती करण्याचे आवाहन केले होते. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) व राज्य सहकारी साखर संघ, मुंबई यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्व खासगी व सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांना ऑक्‍सिजन निर्मिती प्लॅंट उभारणीचे विविध पर्याय व्हीएसआयने दिले होते.

हेही वाचा: "उजनी'च्या मूळ पाणी वाटपात हस्तक्षेप नाही ! खडकवासला धरण विभागाचे स्पष्टीकरण

या तीन संस्थांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील जवळपास 25 कारखान्यांनी ऑक्‍सिजन प्लॅंट आयात करून उभारण्याचा निर्णय घेतला. साखर कारखान्यांसाठी आयात होणाऱ्या स्कीड माउंटेड ऑक्‍सिजन प्लॅंटची 25 ते 30 घनमीटर प्रतितास ऑक्‍सिजन निर्मितीची क्षमता आहे. प्रत्येक प्लॅंटमधून दररोज 90 ते 100 ऑक्‍सिजन सिलेंडर भरले जातील. ते जवळच्या शासकीय व खाजगी रुग्णालयांना माफक दरात पुरविले जाणार आहेत. तसेच अनेक कारखान्यांनी छोटे ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करून आपल्या सभासद व कर्मचाऱ्यांना ऑक्‍सिजनची गरज भासल्यास पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 600 ऑक्‍सिजन कॉन्सनट्रेटर मशिन खरेदी करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील ऑक्‍सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन साखर उद्योगाने ऑक्‍सिजन निर्मितीचे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सॅनिटायझर निर्मितीप्रमाणेच याही बाबतीत महाराष्ट्र लवकरच स्वयंपूर्ण होईल. त्यात साखर उद्योगाचा सिंहाचा वाटा असेल.

- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, विस्मा