esakal | "उजनी'च्या मूळ पाणी वाटपात हस्तक्षेप नाही ! खडकवासला धरण विभागाचे स्पष्टीकरण

बोलून बातमी शोधा

Ujani Dam
"उजनी'च्या मूळ पाणी वाटपात हस्तक्षेप नाही ! खडकवासला धरण विभागाचे स्पष्टीकरण
sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : उजनीचे (Ujani Dam) पाणी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) यांनी इंदापूर (Indapur) तालुक्‍यासाठी पळविल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत आहे. उजनीच्या मूळ पाणी वाटपाला धक्का न लावता पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातून येणारे सांडपाणी इंदापूर तालुक्‍याला दिले जाणार असल्याचे स्पष्टीकरण मंगळवारी खडकवासला धरण (Khadakwasla Dam) विभागाने परिपत्रकाद्वारे दिले आहे. (Khadakwasla Dam Department's explanation that there was no interference in the distribution of original water in Ujani Dam)

उजनीच्या पाण्याचा फायदा इंदापूर तालुक्‍यातील जवळपास 16 हजार हेक्‍टर क्षेत्राला होणार आहे. इंदापूर तालुक्‍याला उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी मिळणार असल्याने उजनीच्या पाणी वाटपामध्ये फेरबदल करण्यात आल्याची अफवा पसरविण्यात आली होती. सोलापूरचे पाणी पळविल्याचा आरोप होऊन काही संघटनांनी आंदोलने सुरू केली होती. उजनीच्या मूळ पाणी वाटपाच्या नियोजनाला धक्का न लावता इंदापूर तालुक्‍याला पाणी देण्यात येणार असल्याचे खडकवासला विभागाने स्पष्ट केले आहे. उजनी धरणाची एकूण पाणीसाठा 117 टीएमसी इतका आहे. मृत साठा 63.66 टीएमसी इतका आहे. वापराचा पाणी साठा 53.57 टीएमसी आहे. उजनी प्रकल्प व त्यावरील सर्व उपसा सिंचन पाणी पुरवठा व औद्योगिक पाणी वापर असे एकूण 84.34 टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे. त्यामुळे मूळ नियोजनावर कोणत्याही प्रकारे बदल करण्यात आला नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यासाठी प्रस्तावित असलेल्या शेटफळगढे उपसा सिंचन योजनेसाठी उजनी जलाशयाच्या प्रकल्पीय पाणी वापरामध्ये कोणताही बदल करणे प्रस्तावित नाही.

हेही वाचा: पंढरपूर निवडणुकीची बातमी अन्‌ माने यांच्याशी राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही

उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या पुणे महानगरपालिका व पिंपरी- चिचवड महानगरपालिका तसेच काही खासगी संस्था व इतर उद्योगांनी सोडलेल्या सांडपाण्यापैकीच 5 टीएमसी पाणी हे उपसा करून खडकवासला कालव्यात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे उजनीच्या मूळ नियोजनामध्ये कोणताही बदल न करता अवर्षणग्रस्त असलेल्या इंदापूर तालुक्‍याला सांडपाणी मिळणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.

पालकमंत्र्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष

इंदापूर तालुक्‍यासाठी उजनी धरणातून पाणी पळवण्याचा आरोप पालकमंत्री भरणे यांच्यावर सातत्याने झाला. स्वपक्षीय नेत्यांनीदेखील त्यांच्यावर आरोप केले. उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी पाणी वाटप झालेले आहे. त्यामुळे सोलापूरच्या वाट्याचे पाणी इंदापूरला तालुक्‍याला नेले जाणार नाही. तसे झाले तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे विधान वारंवार पालकमंत्री भरणे यांनी केले. त्याकडे राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष करीत सातत्याने पालकमंत्र्यांवर आरोप करणेच पसंत केले आहे.