Video: पंकजा मुंडेनी भाजपलाच करून दिली OBC जनगणनेची आठवण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

आपल्याच पक्षाला आठवण करुन देणाऱ्या या दोन ट्विटमुळे सध्या वेगळीच चर्चा रंगत आहे. 

मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ ट्विट करत आपल्याच पक्षाला एका जुन्या वचनाची आठवण करुन दिली आहे. पंकजा मुंडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा ओबीसी जनगणनेच्या मागणीसंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच ओबीसींची जनगणना व्हावी अशी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. या संबंधी हिंदीमध्ये दोन ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी आपल्याच पक्षाकडे ही मागणी केली आहे. 

आजच जालना येथे ओबीसी समाजाच्या वतीने आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 2021 च्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून, लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी तसेच ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि नॉन क्रिमीलियरची अटदेखील रद्द करावी यासह इतरही अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये पंकजा मुंडे उपस्थित राहून समर्थन देणार असल्याची माहिती होती.

हिंदीतून केलेल्या या ट्विट्समधून पंकजा मुंडे यांनी आपल्याच सरकारला ओबीसी जनगणनेबाबत आठवण करुन दिली आहे. आम्ही देखील या देशाचे नागरिक आहोत, आमचीही गणना करा. ओबीसींच्या जनगणनेची आवश्यकता आणि अपरिहार्यता आहे. कुछ यादे और कुछ वादे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी हा जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. आपल्याच पक्षाला आठवण करुन देणाऱ्या या दोन ट्विटमुळे सध्या वेगळीच चर्चा रंगत आहे. 

पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, 2021 ची जनगणना जातीनिहाय होणे आवश्यक आहे. गावागावातून उठलेला आवाज राजधानी पर्यंत जरुर पोहचेल, यात शंका नाही. 
गोपीनाथ मुंडे यांचा संसदेत बोलतानाचा हा व्हिडीओ 2010 सालचा आहे. यामध्ये गोपीनाथ मुंडे यांनी दलित आणि ओबीसींवरील अत्याचारांचा दाखला देत विदारक अवस्था मांडली होती. ओबीसींना न्याय देण्यासाठी त्यांची जनगणना आवश्यक आहे. आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमची मागणी आहे की ओबीसींची आणि एसटी, एससी लोकसंख्येची जनगणना करावी. अन्यथा सरकारला या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde demanded OBC census shared gopinath mundes old vide