परमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल लपवला? दहशतवाद्यांची मदत केल्याचा दावा | Former ACP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल लपवत केली दहशतवाद्यांची मदत?

परमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल लपवत केली दहशतवाद्यांची मदत?

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार असल्याचे दिसते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्यावरील आरोपांनंतर बेपत्ता सिंह यांना कोर्टाने फरार घोषित केलं आहे. अशातच आता एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने परमबीर सिंह यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत. ज्यात परमबीर सिंह यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवला असल्याचा आरोप केला आहे. आणखी काय गंभीर आरोप केले?

निवृत्त एसीपींच्या आरोपामुळे एकच खळबळ, आयुक्तांना पत्र

मुंबईमधील निवृत्त एसीपी शमशेर पठाण (former acp shamsher pathan) यांनी परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली होती असा गंभीर आरोप केला आहे. शमशेर पठाण यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं असून सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या तक्रार अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवला होती अशी शंकाही व्यक्त केली आहे. परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता असं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा आणखी एक पुरावा! मलिकांचा बॉम्ब

प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी

परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी तो मोबाईल क्राइम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा पठाण यांनी तक्रारीत केला आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा याच मोबाइलवरुन कसाबसह इतर दहशतवादी पाकिस्तानमधील हँडलरशी संवाद साधत होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

loading image
go to top