
Crime News : मुलीकडे प्रेग्नेंसी किट सापडल्याने आई-वडिलाने घेतला जीव; ACID टाकून...
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातल्या कॉशाम्बीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २१ वर्षीय तरुणीला तिच्याच आई-वडिलांनी गळा दाबून मारलं. मुलीकडे प्रेग्नेंसी टेस्ट किट सापडली होती. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. पुढे त्यांनी जे केलं तेही संताप आणणारं आहे.
मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या दोन नातेवाईकांच्या मदतीने मुलीचा खून केला. हत्येनंतर तिच्या शरीरावर अॅसिड टाकून तिची ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचा मृतदेह फेकून देण्यात आला. पोलिसांनी बुधवारी माध्यमांना ही माहिती दिली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
तेन शाह अलमाबाद गावातले रहिवाशी नरेश यांनी ३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलीच्या मीसिंगची तक्रार दिली होती. त्यानंतर मंगळवारी सदरील मुलीचं शव गावाबाहेरच्या ओढ्यात सापडलं. पोलिस अधीक्षक बृजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितलं की, तपासादरम्यान नरेश आणि त्याची पत्नी शोभादेवी यांनी ३ फेब्रुवारी रोजी घरामध्येच मुलीचा गळा घोटून खून केला.
एसपींनी पुढे सांगितलं की, मृतदेहाची ओळख मिटवण्यासाठी त्यांनी तिच्या शरीरावर बॅटरी अॅसिड टाकलं. नरेशचे दोन भाऊ गुलाब आणि रमेश यांनीही मृतदेह लपवण्यासाठी त्यांची मदत केली होती. आमची मुलगी अनेक मुलांसोबत मोबाईलवर बोलत होती, असं नरेशने पोलिसांना सांगितलं. तिच्याकडे प्रेग्नंसी किट सापडल्याने संताप आल्याने हे कृत्य केल्याचं समोर येत आहे.