
राजर्षींसाठी रयत स्तब्ध
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना आज कोल्हापूरकरांनी शंभर सेकंद स्तब्धता पाळून अनोख्या पद्धतीने मानाचा मुजरा केला. केवळ कोल्हापूर शहरच नव्हे तर अवघ्या जिल्ह्याने सकाळी दहा वाजता आहे त्या ठिकाणी थांबून ही मानवंदना दिली. निमित्त होते, लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वांतर्गत रयतेच्या राजाला अभिवादनाचे.
शंभर सेकंदाच्या या नीरव शांततेच्या साक्षीने साऱ्यांनी राजर्षी शाहूंचा विचार जपण्याचा, तो आणखी सर्वदूर पोचविण्याचा निर्धार केला. राज्यभरात विविध ठिकाणांवर राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळ परिसरात अभिवादनाचा मुख्य सोहळा झाला. अभिवादनाची वेळ सकाळी दहाची. पण, सकाळी सातपासूनच येथे शाहूप्रेमींनी गर्दी केली होती. साडेआठनंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आणि शहरातील पाच अशा एकूण सतरा ठिकाणांहून निघालेल्या कृतज्ञता व समता फेरींचे येथे मशाली घेऊन आगमन होऊ लागले आणि शाहू समाधीस्थळ परिसर ‘राजर्षी शाहू महाराज की जय’अशा जयघोषाने दुमदुमून गेला.
प्रमुख मान्यवरांचे साडेनऊच्या सुमारास आगमन झाले आणि साऱ्यांच्या नजरा हातातील घड्याळांवर खिळल्या. बरोबर नऊ वाजून ५९ मिनिटांनी सारी मंडळी आहे त्या ठिकाणी उभी राहिली आणि बरोबर दहा वाजता सारा परिसर स्तब्ध झाला. शंभर सेकंदाच्या अभिवादनानंतर पुन्हा ‘राजर्षी शाहू महाराज की जय'' असा जयघोष सुरू राहिला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, ‘सकाळ’माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध पक्ष, संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सर्वच घटकांचा सक्रिय सहभाग
लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी सर्वच घटक सक्रिय सहभागी झाले. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्नलवर एस.टी. बसेस, अन्य वाहने, जागेवर थांबविण्यात आली. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी आणि नागरिकांनी उपक्रमात सहभागी होऊन लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली. शेतीत राबणाऱ्या बळीराजापासून ते उद्यमनगरातील मशीनवर काम करणाऱ्या कामगारापर्यंत आणि चहागाडीवाल्यापासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वच घटकांनी अभिवादन कार्यक्रमात स्वयंस्फूर्त सहभाग घेतला.
दिवसभरात
जिल्ह्यातील बारा तालुके आणि कोल्हापूर शहरातून पाच अशा एकूण १७ कृतज्ञता व समता फेरी सकाळी साडेआठपासून शाहू समाधिस्थळी दाखल
शाहूवाडी येथून तब्बल ४५ किलोमीटरचे अंतर धावत समता फेरी शाहू समाधी स्थळी आणली
शहरातून पाण्याचा खजिना, शाहू जन्म स्थळ, रेल्वे स्टेशन, शाहू मिल आणि सोनतळी येथून समता फेरी आल्या.
समाधिस्थळी सहज सेवा ट्रस्ट, छत्रपती शिव शाहू फाउंडेशनतर्फे पाच हजार लोकांसाठी पर्यावरणपूरक पद्धतीने चहा- नाश्ता देण्यात आला.
शंभर सेकंद अभिवादन उपक्रमाची क्षणचित्रे शहरातील आठ चौकातून ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात आली.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह संयोजन समितीने सुक्ष्म नियोजन केले.
ज्या वृत्तीविरोधात राजर्षी शाहू महाराज लढले, ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिवंत असेल तिथे लढूया. सामाजिक समता स्थापित करून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांना अपेक्षित समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी काम करू या.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Web Title: People Kolhapur Lokaraja Rajarshi Shahu Maharaj Unique Way Observing Hundred Second Silence Death Anniversary Chief Minister Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..