
Eknath Shinde : पक्षाचं नेतृत्व करणारा किती मजबूत हेच लोक बघतात; अजित पवारांचं सूचक विधान
पुणे - केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात निकाल देत एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह दिलं आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात गदारोळ सुरू आहे. त्यातच अजित पवार यांनी पक्षाच्या नेतृत्वाबाबत सूचक विधान केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली असली तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महाविकास आघाडीतील सर्व सदस्य त्यांच्यासोबत आहेत. अशा प्रकारच्या घटना याआधीही घडल्या आहेत. व्ही.व्ही गिरी आणि संजीव रेड्डी यांच्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली होती. संजीव रेड्डींना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र इंदिरा गांधींनी व्ही.व्ही. गिरींना निवडून आणलं होतं. त्यामुळे पक्षात फूट पडली होती.
दरम्यान त्यानंतर काँग्रेसचे चिन्ह होतं बैल-जोडी. त्यानंतर गाय-वासरू झालं. त्यानंतर पंजा चिन्ह झालं. शेवटी लोक पक्षाच्या पाठिशी कोण मजबूत नेता आहे ते बघत असतो. जसं तेलुगू देसममध्ये एनटी रामारावांनी पक्षा काढला. त्यांच्या निधनानंतर चंद्राबाबू नायडूंनी तो पक्ष पुढं नेला. तामिळनाडूमध्ये तेच झालं. पक्ष हा नेतृत्वावर चालतो. काँग्रेस पक्षावर गांधी-नेहरू घराण्याचा करिष्मा आहे. त्यांच्या करिष्म्यावर तो पक्ष सुरू आहे.
भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आहे. त्यामुळे भाजप सर्वदूर पोहोचला. भाजपच्या लोकांनी मला सांगावं, की आपण म्हणताय ते चुकीचं आहे. आम्ही अमूक-अमूक पक्षाला नेतृत्व देऊ शकतो. तशी परिस्थिती नाही. शरद पवार यांच्याकडे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालतोय. तसं शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनच मतदार त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आणि कर्तृत्व आहे. ते महाराष्ट्रात फिरून पक्ष बांधणी करतील आणि मतदार त्यांच्या पाठिशी उभे राहतील अशी आशा व्यक्त केली.