Rashmi Shukla : जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी झाला

काही स्तरावर जनतेचा पोलिस दलावरील विश्वास कमी झाला आहे हे स्वत: राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी जाहीरपणे मान्य केले.
rashmi shukla
rashmi shuklasakal

मुंबई - काही स्तरावर जनतेचा पोलिस दलावरील विश्वास कमी झाला आहे हे स्वत: राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी जाहीरपणे मान्य केले. पोलिस दलातील कोणत्याही सदस्याकडून हिंसा, शोषण किंवा गैरवर्तनाची कोणतीही अन्यायकारक कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

पोलिस अधिकाऱ्याकडून न्याय मिळत नसेल तर पोलिस महासंचालक कार्यालयात थेट तक्रार करावी, असे खुले आवाहन करीत यापुढील काळात भूतकाळातील चुका मागे टाकून जनतेचा विश्वास संपादन केला जाईल, असे शुक्ला यांनी सांगितले. राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारून रश्मी शुक्ला यांना एक महिना झाला आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्थेवरून विरोधकांनी सरकारला घेरले असताना रश्मी शुक्ला स्वत: मैदानात उतरल्या आहेत. ‘काही स्तरावर जनतेचा पोलिस दलावरील विश्वास कमी झाल्याचे ‘एक्स’वरून प्रसिद्ध केलेल्या आवाहनात त्यांनी सुरुवातीलाच मान्य केले आहे. त्याचबरोबर भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी असल्याची ग्वाहीही दिली आहे.

गैरवर्तन केले तर खबरदार

राज्यात अलीकडच्या काळात पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप होऊ लागल्याने त्याचीही गंभीर दखल रश्मी शुक्ला यांनी घेतली आहे. पोलिस दलातील कोणाकडूनही हिंसा, शोषण किंवा गैरवर्तन केले जात असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस महासंचालक रश्‍मी शुक्ला राज्यातील पोलिसांना दिला आहे. तसेच संबंधिक पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांना न्याय मिळत नसेल तर थेट पोलिस महासंचालक कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

रश्‍मी शुक्ला यांचे निवेदन

‘महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की, काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलिस दलावरील विश्वास कमी झाला आहे.

भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास परत जिंकणे, ही आमची जबाबदारी आहे. राज्यातील सर्व पोलिस कर्मचारी तुमचे आणि तुमच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहू,’ असा विश्वास रश्मी शुक्ला यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.

पहिल्या महिला पोलिस महासंचालक

रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक आहे. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप केले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.

शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्या १९८८ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. सशस्त्र सीमा दलाचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्याशिवाय पुणे पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले.

जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी पोलिस महासंचालक तुमच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी यंत्रणा केली जात आहे.

- रश्मी शुक्ला, पोलिस महासंचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com