esakal | FactCheck : केंद्र सरकारकडून बेरोजगारांना मिळतायेत ३५०० रुपये?
sakal

बोलून बातमी शोधा

Money

केंद्र सरकारकडून बेरोजगारांना मिळतायेत ३५०० रुपये?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात अनेक लहान-मोठे उद्योगव्यवसाय ठप्प झाल्यामुळे असंख्य जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच हातात कामधंदा नसल्यामुळे तरुणांची पावलं गुन्हेगारीकडे वळतांना दिसत आहेत. यामध्येच सध्या ऑनलाइन फसवणूक, नोकरीचं खोट आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळणे अशी अनेक प्रकरणं सध्या घडत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (social media) पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गंत बेरोजगार तरुणांच्या खात्यात दरमहा ३५०० रुपये जमा होत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, ही माहिती खोटी (Fake News) असल्याचं पीआयबीने स्पष्ट केलं आहे. सोबतच अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका असंही त्यांनी सांगितलं आहे. (PIB-Fact-Check-beware-link-of-unemployed-allowance-scheme-spreading-rapidly-in-social-media)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक लिंक व्हायरल होत आहे. या लिंकमध्ये पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेची माहिती देण्यात आली असून सोबतच प्री -रजिस्ट्रेशन करण्याचं तरुणांना आवाहन करण्यात येत आहे. मात्र, व्हायरल होत असलेली ही माहिती खोटी असून या अफवांवर विश्वास ठेऊ नका असं पीआयबीने म्हटलं आहे.

"पंतप्रधान बेरोजगार भत्ताअंतर्गंत केंद्र सरकार तरुण बेरोजगारांना दरमहा ३५०० रुपये देत असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मात्र, #PIBFactCheck ने केलेल्या तपासणीमध्ये हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा मेसेज फेक आहे. त्यामुळे कोणत्याही अशा फसवेगिरी करणाऱ्या संकेतस्थळावर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करु नका", असं ट्विट पीआयबीने केलं आहे.

दरम्यान, या योजनेअंतर्गत १० वी पास असलेल्या १८ ते ४० वयोगटातील व्यक्तीच रजिस्ट्रेशन करु शकतात असं सांगण्यात आलं आहे. सोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी २७ मे ही अंतिम तारीख असल्याचंही सांगण्यात आलं आहे.