Vidhan Sabha 2019 : विरोधक हताश आणि निराश : नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 October 2019

जय शिवशंभो, वैद्यनाथाच्या पावनभूमीत आणि माझे मित्र गोपीनाथांच्या कर्मभूमीत मी आज आलो आहे. संतभूमी असलेल्या मराठवाड्यातील जनतेला माझा नमस्कार, असे म्हणत मोदींनी मराठीत भाषणाची सुरवात केली. 

परळी : विरोधी पक्ष आता हताश आणि निराश लोकांनी भरलेला आहे. तुमचे नेते तुम्हाला सोडून का जात आहेत, याचा विचार करा. युवा आणि ज्येष्ठ पक्ष सोडून जात आहेत, तर जे राहिले आहेत ते हताश आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना टोला लगाविला. तसेच मोदींनी पुन्हा आणूया आपले सरकार असा नारा दिला.

परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी मोदींची आज (गुरुवार) परळीत सभा झाली. या सभेपूर्वी मोदींनी वैजनाथ येथे जाऊन बाबा वैजनाथ यांचे दर्शन घेतले. जय शिवशंभो, वैद्यनाथाच्या पावनभूमीत आणि माझे मित्र गोपीनाथांच्या कर्मभूमीत मी आज आलो आहे. संतभूमी असलेल्या मराठवाड्यातील जनतेला माझा नमस्कार, असे म्हणत मोदींनी मराठीत भाषणाची सुरवात केली. 

मोदी म्हणाले, ''आपल्या देशावर महादेवाची कृपा आहे. सोमनाथपासून वैजनाथपर्यंत मला आशीर्वाद मिळालेला आहे. तुम्ही मला गोपीनाथ आणि प्रमोद महाजनसारखे मित्र दिले आहेत. आपण कायम येथे कमळाला मतदान केले आहे. यंदा मागील सर्व विक्रम मोडीत निघतील अशी परिस्थिती आहे. ही गर्दी पाहून काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय होत असेल. विरोधकांना धडकी भरवणारी ही गर्दी आहे. भाजपकडे लाखो कार्यकर्ते असे आहेत, की जे कर्मठ आहेत आणि पक्षासाठी जीव ओतून काम करतात. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते तुम्हाला सोडून का जात आहेत? युवा आणि ज्येष्ठ पक्ष सोडून जात आहेत, तर जे राहिले आहेत ते हताश आहेत. जे बीड विचार करत आहे, तोच विचार महाराष्ट्राचा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या कामामुळे महायुतीचे वातावरण आहे. आमची कार्यशक्ती आणि विरोधकांची स्वार्थशक्ती याची लढाई आहे. मराठवाड्यात वॉटरग्रीड करण्याची योजना भाग्यशाली आहे. मराठवाड्यातील दुष्काळ हे मोठे संकट आहे. नदीजोड प्रकल्पातून दुष्काळ हटविण्यात येणार आहे. यापूर्वी चोरी होत असलेले सरकारी योजनांचे पैसे आता थेट तेथे पोहचत असल्याने विकासाची कामे होत आहेत. एक कोटी महिलांना बचत गटाशी जोडणार आहे.''  

आम्ही काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर विरोधकांनी अनेक वक्तव्ये केली. कलम 370 हटविल्यानंतर दलित, महिलांना न्याय मिळाला. देशनितीसाठी आम्ही निर्णय घेत असतो. कलम 370 हटविण्याची खिल्ली उडविणाऱ्यांची इतिहासात नोंद होईल. काँग्रेसचे नेते विरोधात वक्तव्ये करत आहेत. काश्मीरला तुम्हाला जायचे असेल तर सांगा मी व्यवस्था करतो. देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवा. आता संधी आली आहे विरोधकांना धडा शिकवा. आमच्या सरकारने अनेक विकासाची कामे केली आहेत. हर घर जल या मोहिमेतून आम्ही प्रत्येकाच्या घरात पाणी पोचविले आहे. गरिबांना पक्की घरे दिली आहेत, असे मोदींनी सांगितले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, की मोदीजी प्रचारासाठी आल्याने अत्यंत आनंद होत आहे. 1998 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथे आले होते. त्यानंतर तुम्ही आला आहात. कलम 370 हटविण्याचा निर्णय स्वाभिमानी निर्णय आहे. केवळ मोदींमुळेच हे शक्य झाले आहे. तुम्ही आल्याने आमच्या बीड जिल्ह्याचा दुष्काळ दूर होईल. तुमच्यामुळेच बीड जिल्ह्यात रेल्वे आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे झाली आहेत. मोदीजी तुम्ही आल्याने मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi attacks Sharad Pawar agiain in rally at Parli