
सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेअंतर्गत राज्यातील २२ प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना आता बॅंकेतून अर्थसहाय्य मिळणार आहे. तीन लाखांपर्यंत कमी व्याजदराने मिळणाऱ्या कर्जाला कोणत्याही प्रकारची बॅंक गॅरंटी लागत नाही, हे योजनेचे वैशिष्ट्य आहे. आता योजना तातडीने सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरु आहेत.
विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली. सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जवळपास ३२ ते ३५ लाख कारागिरांना या योजनेतून बॅंकांकडून विनातारण कर्ज मिळणार आहे.
पहिल्यांदा पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल आणि त्यानंतर पहिल्यांदा त्या कारागिरास १५ हजार रुपयांपर्यंत साहित्य किंवा तेवढी रक्कम दिली जाणार आहे. प्रशिक्षणार्थीला त्याअंतर्गत दररोज ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यांच्या उत्पादनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र, ब्रॅंडिंग व जाहिरातीतून मार्केट उपलब्ध करून देण्यास मदत केली जाणार आहे.
पंतप्रधानांच्या या नवीन योजनेची प्रभावी अंमलबजावणी बॅंकांच्या माध्यमातून होणार आहे. विश्वकर्मा योजनेअंतर्गत भारतीय कारागिरांना कमी व्याजदरात तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कोणतीही बँक गॅरंटी लागणार नाही. या कर्जाचा व्याजदर अत्यंत कमी असणार आहे. त्यामुळे पारंपारिक कला जतन होतील, असा योजनेचा हेतू आहे.
‘हे’ कारागीर योजनेचे लाभार्थी
सुतार, होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपारिक कारागीर, सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनविणारे, कुलूप-किल्ली बनविणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, न्हावी, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी व मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागीर या योजनेचे लाभार्थी असणार आहेत.
योजनेबद्दल ठळक बाबी...
- ‘स्किल इंडिया’ पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र मिळणार त्यानंतर प्रशिक्षण
- योजनेतील लाभार्थी कारागिरांना पाच दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक
- प्रशिक्षण कालावधीत दररोज ५०० रुपयांप्रमाणे स्टायफंड तथा शिष्यवृत्ती मिळणार
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये किंवा साहित्य किट मिळेल आणि त्यानंतर प्रमाणपत्र मिळणार
- प्रमाणपत्र जोडून बॅंकेकडे योजनेअंतर्गत करावी कर्जाची मागणी, सुरवातीला मिळणार बिनव्याजी एक लाख रुपये
- बिनव्याजी कर्जाची वेळेत परतफेड केल्यास मिळणार पुढील दोन लाखांचे कर्ज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.