Maharashtra Budget 2022: अजित पवारांनी कवितेनं भरला अर्थसंकल्पीय भाषणात रंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

अजित पवारांनी कवितेनं भरला अर्थसंकल्पीय भाषणात रंग

राज्यात सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. आजचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी काव्यमय पद्धतीने सादर केल्याचे दिसून आले. विविध विषयाला घेऊन त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना कविता म्हटल्या. यातुन अजित पवार हे कविताप्रेमी असल्याचे विशेष निदर्शनास आले.

शेती आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी बैलगाडा शर्यती सुरू राहाव्यात अशी ठाम भूमिका घेऊन महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आणि बैलगाडा शर्यतींची परवानगी मिळवली. महाराष्ट्रातील स्थानिक जातींच्या सुदृढगोवंशांची पैदास यामुळे अबाधित राहील असा विश्वास अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी कवी विठ्ठल वाघ यांची कविता सादर केली.

“बैल घामाची प्रतिमा,

बैल श्रमाचे प्रतिक,

बैल माझ्या शिवारात...

काढी हिरवे स्वस्तिक”

हेही वाचा: Maharashtra Budget Session : अजित पवारांच्या अर्थसंकल्पात काय? वाचा एका क्लिकवर

अजित पवार यांनी राज्यातल्या कोरोनायोद्ध्यांचेही कौतुक केले. कोरोनाच्या काळात सरकारने बजावलेल्या कामगिरीचं देश-विदेशात कौतुक झालं.. राज्यातल्या कोरोनायोद्ध्यांनी जीवाची जोखीम पत्करून सेवा दिली, असेही पवार म्हणाले.

याबाबत संदर्भ देताना अजित पवार यांनी काही म्हटल्या. “निष्ठेने केली सेवा,

ना केली कधी बढाई,

दिला शब्द राज्याला,

की धैर्याने जिंकू लढाई...

लढाई लढतानाही...

विजयाची जागवली आशा,

देशानं पाहिलं अवघ्या..

आम्ही दाखवली दिशा..”

हेही वाचा: चांद्यापासून बांद्यापर्यंत, आमचा अर्थसंकल्प सर्व घटकांसाठी - अजित पवार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 125 वा स्मृतीदिन नुकताच 10 मार्च 2022 रोजी झाला. फुले दांपत्याचे निवासस्थान “फुलेवाडा” पुणे शहरातील गंजपेठेत आहे. राज्य संरक्षित वारसास्थळ असलेल्या या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी महाविकास आघाडी सरकार यावर्षी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. यावेळी अजित पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यासाठी कविता सादर केली.

“ज्ञान उजळळे घरात माझ्या, घर झाले सोनेरी...

रस्ता नव्हता सोपा, हा पण होता गं काटेरी,

डगमगली ना तरी कधी ती, पुढे चालली बाई...

शिकवते देऊनी विश्व हातावर, सावित्रीआई…”

हेही वाचा: अर्थसंकल्पात आमच्याच योजनांचा पाढा ; फडणवीसांचा हल्लाबोल

या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संत जगनाडे महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या पुणे जिल्ह्यात असलेल्या सुदुंबरे येथे या क्षेत्राला तीर्थक्षेत्र वपर्यटन स्थळाचा दर्जा दिला गेला आहे. श्री संत जगनाडे महाराजांच्या स्मारकाचा विकास आणि परिसरातील सौंदर्यीकरणासाठी 10 कोटी रूपये निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

श्रीसंत जगनाडे महाराज यांच्याविषयी बोलताना अजित पवार यांनी कवितेतुन त्यांची महती सांगितली.

“आमचा तो घाणा, त्रिगुण तीळाचा,

नंदी जोडियेला, मन पवनाचा,

भक्ती हो भावाची, लाट टाकियली,

शांतीशीळा ठेविली, विवेकावरी.…”

अशा शब्दात श्रीसंत जगनाडे महाराज यांनी संत जगनाडे महाराजांचे गोडवे गायले.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची १२ मार्च ला जयंती आहे. याची आठवण ठेवत प्रसिद्ध गीतकार सुधीर मोघे यांची यशवंतराव चव्हाण यांच्यावर असलेली कविता सादर करत अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले.

“तू नेता.. योद्धा वीर राष्ट्रसंग्रामी,

तू राजधुरंधर, माणूस अंतर्यामी,

तू लेखक, वक्ता, रसिक स्वयंप्रज्ञेचा,

तू जणू प्राण यशवंत महाराष्ट्राचा”

सोबतच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून, यशवंतराव चव्हाण यांना अपेक्षित असलेला, त्यांच्या स्वप्नातला प्रगत, पुरोगामी, समर्थ, बलशाली महाराष्ट्र घडवण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केलाय.

Web Title: Poems Recited By Ajit Pawar While Presenting The Budget In Vidhansabha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top