
तात्या लांडगे
सोलापूर : जानेवारी २०२४ ते जुलै २०२५ या काळात सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल ११४ जणांना तडीपार केले असून ३९ जणांची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात केली आहे. दोनपेक्षा जास्त गुन्हे केलेल्यांवर कारवाईचे सत्र सुरू असून आणखी २९ जण पोलिसांच्या रडारवर आहेत.
शरीराविषयक व मालाविषयक दोन किंवा त्याहून जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांच्या वर्तनात सुधारणा अपेक्षित आहे. अशा सराईत गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा केला की त्यांच्यावर तडीपारीची किंवा स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांचा नेहमीच वॉच आहे. बेकायदा जमाव जमविणे, खंडणी मागणे, इच्छापुर्वक दुखापत करणे, धमकावणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा गल्लीतील ‘दादा’बद्दल सामान्य लोक उघडपणे माहिती देत नसतात. अशावेळी पोलिस शहराच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी त्यांची रवानगी थेट येरवडा कारागृहात करतात. दीड वर्षात सोलापूर शहरातून अशा ३९ जणांना तुरुंगात पाठविले आहे. आणखी १० ते १२ जण त्या रांगेत आहेत.
याशिवाय भारतीय न्याय संहितेतील कलम ५५ नुसार सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर आणि कलम ५७ नुसार दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे (शरीराविषयक व मालाविषयक) सिद्ध झालेल्या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली जाते. दीड वर्षात शहरातील १४१ जणांना सोलापूर व धाराशिव, सोलापूर व पुणे अशा दोन जिल्ह्यातून तडीपार केले आहे. पोलिस आयुक्त एम राज कुमार यांच्या कार्यकाळात पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दोन वर्षांत सर्वाधिक (२०० हून जास्त) तडीपारीच्या कारवाया केल्या आहेत.
सर्वांचेच रेकॉर्ड पोलिसांकडे
कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक शांतता बिघडेल असे कोणाचेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही. वतर्नात सुधारणा करण्याची संधी देऊनही कोणी पुन्हा तसेच कृत्य करीत असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होईल. गुन्हे दाखल असलेल्या सर्वांचे रेकॉर्ड पोलिसांकडे आहेच.
- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
दीड वर्षात ३९ जण येरवडा कारागृहात
जानेवारी २०२४ ते जुलै २०२५ या काळात सोलापूर शहर गुन्हे शाखेने शहरातील तब्बल ३९ जणांवर ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्या सर्वांची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने पहिल्यांदाच पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर करणाऱ्या टोळीवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.