पोलिस आयुक्तांचा इशारा! रात्री दहानंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई; 'या’ दुकानांवर राहणार निर्बंध गरबा अन् दांडीया स्पर्धेसाठी परवानगी बंधनकारक

नवरात्र महोत्सवात महिला, तरुणी गरबा, दांडियाचा सराव मोठ्या प्रमाणावर करतात. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसतील, पण एखाद्या संस्थेच्या वतीने किंवा मंडळातर्फे दांडीया, गरबा स्पर्धा आयोजित केल्यास त्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.
solapur city
CP M. rajkumaresakal
Updated on

सोलापूर : नवरात्र महोत्सवात महिला, तरुणी गरबा, दांडियाचा सराव मोठ्या प्रमाणावर करतात. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसतील, पण एखाद्या संस्थेच्या वतीने किंवा मंडळातर्फे दांडीया, गरबा स्पर्धा आयोजित केल्यास त्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. गरबा, दांडियाचे सराव ज्याठिकाणी महिला, तरुणी करतात, त्याठिकाणी पोलिसांचे पेट्रोलिंग राहणार आहे.

नवरात्र उत्सवात दर्शनासाठी महिला घराबाहेर पडतात. याशिवाय गरबा-दांडीयाच्या सरावासाठी देखील महिला बाहेर जातात. त्यांना सुरशिक्षितपणे शहरातील कोणत्याही भागातून बिनधास्तपणे फिरता यावे, यासाठी पोलिसांकडून रात्री दहानंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची व वाहनचालकांची तपासणी होईल. मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून (ता. ३) १२ ऑक्टोबरपर्यंत शहरातील तीन पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वात दररोज शहरातील वेगवेगळ्या भागातील पाहणी केली जाणार आहे. त्या परिसरातील रात्री दहानंतर सुरु असलेल्या पानटपऱ्या, चहा कॅन्टीन, वडापाव सेंटर, चायनीज गाड्यांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय ज्या दुकानांसमोर विनाकारण थांबणाऱ्यांची गर्दी राहील, त्यांच्यावर देखील कारवाई करून ते दुकान रात्री दहापूर्वी बंद करावे लागेल, असा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.

'या’ दुकानांवर राहणार निर्बंध

शहरातील हॉटेल, अत्यावश्यक सेवेतील दुकाने याशिवाय ज्या दुकानांना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे, त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसतील. पण, विनापरवाना शहरातील विविध भागात रात्री दहानंतरही सुरु राहणाऱ्या चायनीज हातगाडे, पानटपऱ्या, चहा कॅन्टीन, वडापाव सेंटर यांच्यावर निर्बंध असणार आहेत. तेथे विनाकारण टवाळखोर किंवा मद्यपी रात्री उशिरापर्यंत थांबलेले असतात.

नवरात्र महोत्सवात ‘हे’ रस्ते राहणार बंद

नवरात्रोत्सवात उद्यापासून (गुरुवार) १२ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत शहरातील सम्राट चौक ते रुपाभवानी चौक, मड्डी वस्ती क्रॉस रोड ते रुपाभवानी चौक, बलिदान चौक ते रुपाभवानी चौक आणि हैदराबाद-पुणे बायपास क्रॉस रोड ते रुपाभवानी चौक हे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. याशिवाय रुपाभवानी मंदिराचा १०० मीटर परिसर ‘नो पार्किंग’ झोन राहील. मड्डी वस्तीकडून घोंगडे वस्तीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कुंभारवेसमार्गे बलिदान चौक व पुढे कस्तुरबा मार्केटमार्गे सम्राट चौकाकडे जाता येईल. सम्राट चौकाकडून जुना कारंबा नाका येथे जाणाऱ्या वाहनांना जुना तुळजापूर नाकामार्गे मड्डी वस्तीकडे जाता येईल. याशिवाय उत्सव काळात बाजारपेठांमध्ये विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. यामुळे बाळीवेस चौकातून मधला मारुतीमार्गे कोंतम चौक व माणिक चौकाकडून मधला मारुतीमार्गे मंगळवार पेठ पोलिस चौकीचा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पेट्रोलिंग राहील

गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सवातदेखील रात्री दहानंतर विनाकारण रस्त्यांवरून फिरतात किंवा ठिकठिकाणी टवाळखोरी करत थांबणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील सर्वच भागात पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पेट्रोलिंग राहील.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर

नवरात्रोत्सवातील बंदोबस्त

  • एकूण अधिकारी

  • ६४

  • पोलिस अंमलदार

  • ८७०

  • होमगार्ड

  • ८००

  • एसआरपीएफ

  • १ कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com