esakal | कौरव-पांडव अन् धर्मयुद्ध; पंकजा मुंडेंच्या मनातील 'महाभारत'
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत बोलताना आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. असे असले तरी त्यांनी कौरव-पांडवांचं उदाहरण देऊन मनातील खदखद महाभारतातील दाखले देऊन व्यक्त केल्याचं बोललं जातंय

कौरव-पांडव अन् धर्मयुद्ध; पंकजा मुंडेंच्या मनातील 'महाभारत'

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत बोलताना आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. असे असले तरी त्यांनी कौरव-पांडवांचं उदाहरण देऊन मनातील खदखद महाभारतातील दाखले देऊन व्यक्त केल्याचं बोललं जातंय. या वक्तव्यातून त्यांनी अनेकांना सूचक इशारा दिलाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये. त्या नेमकं काय म्हणाल्या हे आपण पाहू... (politics mahabharat bjp leader pankaja munde trust pm modi and amit shah)

पंकजा म्हणाल्या की, जगात देशाची मान उंचावणाऱ्या पंतप्रधानांनी माझा कधीच अपमान केला नाही. राष्ट्रीय नेत्यांकडूनही नेहमीच सन्मान मिळाला. पांडवांनी धर्म युद्ध जिंकलं. कौरव मोठ्या संख्येने होते. पांडव जिंकले कारण त्यांच्याकडे धर्म होता, नीती होती, सारथी कृष्ण होता, सत्ता करण्याची क्षमता होती. त्यांच्यावर अन्याय झाला. त्यांनी केवळ पाच गावं मागितली होती. सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीनही देण्यास कौरवांनी नकार दिला. धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. लोक धारातिर्थी पडू नये, लोकांचा जीव जाऊ नये यासाठी असा विचार त्यावेळचे योद्धे करायचे. आम्ही नव्या काळातील योद्धे आहोत. मी धर्मयुद्ध टाळण्याचा तोपर्यंत प्रयत्न करते जोपर्यंत शक्य आहे.

हेही वाचा: मंत्रिपद मिळवणं हा माझ्या राजकारणाचा पाया नाही- पंकजा मुंडे

घर फुटल्याचं, बाप गमावल्याचं आणि पराभवाचं दु:ख आम्ही भोगलंय. कारण, आम्ही कुणालाच भीत नाही. पण, मी काहींचा आदर करते. माझ्यावर निर्भय राजकारणाचे संस्कार आहेत. मी माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठ्या माणसांचा कधीच अपमान केला नाही. लोकांच्या जीवावर मी निर्भय आहे. युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी शेवटपर्यंत केला. मी पांडव आहे. माझे सैनिक धारातीर्थी पडताहेत. कार्यकर्त्यांना सन्मान मिळावा अशी माझी भावना आहे. धर्मयुद्ध टाळण्यासाठी समर्थकांनी माझं ऐकावं. आपलं घर आपण का सोडायचं? आपण हे घर कष्टानी, घामांनी बनवलं आहे. ज्या दिवशी छत अंगावर पडेल, त्यादिवशी पाहू. मी घर सोडणार नाही. माझा नेता मोदी, शहा, जेपी नड्डा आहेत. मला विश्वास आहे की त्यांच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी चांगलं आहे. आता आपल्याकडे काय आहे. मला माझ्यासाठी काही नको. मला लोकांसाठी हवं आहे. मी आज पालकांच्या भूमिकेत आहे. त्यामुळे मला सजवण्याचा प्रयत्न करु नका. मला कशाचीही गरज नाही, असं सांगत सत्ता आणि खुर्चीचा लोभ नसल्याचं त्या म्हणाल्या.

कौरवांसोबत जेवढे लोक होते ते मनानी पांडवांसोबत होते आणि शरीरानी कौरवांसोबत. कौरवांचे सारथी देखील त्यांच्यासोबत नव्हते. त्यामुळे काळ कोणासोबत थांबत नाही. मी दु:खी नाही. तुमचं दु:ख माझ्या ओटीत टाका. माझं हसू तुम्ही घ्या. आपण खूप संघर्ष पेलले आहेत. माझं समर्पन लोकांप्रती आहे. धर्मयुद्ध टाळण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. मला खूप काळजीने निर्णय घ्यावे लागतात. आपण, केंद्रीय नेतृत्वार विश्वास ठेवुयात. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही. स्वाभिमान हा गोपीनाथ मुंडे यांचा बाणा होता आणि तो जपायचाय असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

loading image