विदर्भात गारपिटीचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली. दिल्ली केंद्राच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार आजपासून (ता. १०) विदर्भात वादळी वारे, विजांसह, हलका पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह तापमानात चढ-उतार होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली. दिल्ली केंद्राच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार आजपासून (ता. १०) विदर्भात वादळी वारे, विजांसह, हलका पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह तापमानात चढ-उतार होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर आता विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पूर्वेकडून वाहत असणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पूर्व विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ढग गोळा झाले आहेत. 

राज्यातील किमान तापमानातही मोठी घट झाल्याने नाशिक, मालेगाव वगळता सर्वच ठिकाणी थंडी नाहीशी झाली आहे. रविवारी नाशिक येथे राज्यातील नीचांकी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आजपासून विदर्भात सर्वच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी (ता. ११) आणि बुधवारी (ता. १२) विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत पावसाला पोषक हवामान आहे. दुपारनंतर ढग जमा होऊन, मेघगर्जना, विजांसह गारपीट होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात रविवारी कमी दाब क्षेत्र तयार होण्याची शक्यता होती. मात्र कमी दाबाचे क्षेत्र आज (ता. १०) हे तयार होईल, तसेच त्याची तीव्रता वाढत जाईल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले अाहे.

दरम्यान, शनिवारी दुपारी हतनुर (ता. सेलू) येथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे.

रविवारी (ता. ९) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.०(४), जळगाव १५.२(३), कोल्हापूर २१.२(६), महाबळेश्‍वर १५.६(२), मालेगाव १३.६ (३), नाशिक ११.३(१), सांगली १८.१(४), सातारा १६.९ (३), सोलापूर २१.४(६), सांताक्रुझ १७.०(-२), अलिबाग १९.३(०), रत्नागिरी २१.२(१), डहाणू १८.०(३), आैरंगाबाद १५.६(४), परभणी १८.५ (५), नांदेड २१.० (८), अकोला १८.९(५), अमरावती १७.४(२), बुलडाणा १८.५ (४), चंद्रपूर १९.६(६), गोंदिया १४.५(१), नागपूर १६.१(३), वर्धा १८.३(३), यवतमाळ १८.४ (४).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: possibility of hailstorm in Vidharbha